नांदेड जिल्ह्यात पावसाने हाहाकार, मुखेडमध्ये तीन पाझर तलाव फुटले; हजारांवर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या 48 तासांपासून पावसाने नांदेड जिल्ह्यात हाहाकार उडवला आहे. जिल्ह्यातील 36 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुखेड तालुक्यात तीन पाझर तलाव फुटल्याने शेकडो हेक्टरमध्ये पाणी घुसले. माकणी येथे एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला. जिल्ह्यात आतापर्यंत हजारांवर नागरिकांना पुराच्या वेढ्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, विष्णुपुरी प्रकल्प तुडुंब भरल्याने एक दरवाजा उघडून गोदापात्रात विसर्ग करण्यात आला. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने जिल्ह्यातील शाळांना शनिवारी सुटी देण्यात आली.

गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यात पावसाची संततधार चालू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. मुखेड तालुक्यात तीन पाझर तलाव फुटल्याने शेकडो हेक्टरमध्ये पुराचे पाणी घुसले. हे पाणी थेट लोकवस्तीपर्यंत आल्याने एकच धावपळ झाली. माकणी येथे दुथडी भरून वाहणारा नाला ओलांडताना धोंडिबा गोविंद हाळगीर हा वाहून गेला. आज सकाळी कोळनूर गावालगत त्याचा मृतदेह आढळला. धर्माबाद तालुक्यातील सिरसखोड, बामणी, येळेगाव, मनूर व संगम या गावांचा पुरामुळे संपर्क तुटला आहे. बन्नाळी गावात पावसाचे पाणी घरात शिरल्याने तेथील दीडशे लोकांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलवले आहे. हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली गावाच्या नाल्याला पूर आल्याने या गावाचा संपर्क तुटला आहे.

मुक्रमाबाद परिसरातील तारदळवाडी येथील साठवण तलाव फुटल्याने शेतात पाणी शिरले आहे. यामुळे शेतजमिनी खरडून निघाल्या आहेत. बिलोली तालुक्यात येसगी येथील मांजरा नदीला पूर आल्याने तेथील जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिसरातील माचनूर, बोळेगाव, आरळी, कासराळी, गंजगाव, बेळकोणी या गावांत नाल्यांचे पाणी शिरल्याने त्या भागातील एक हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. गंजगाव ते येसगी या मार्गावर असलेल्या पुलावर काम करत असलेल्या तीन कामगारांना तहसीलदारांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी विविध भागांत जाऊन पाहणी केली. अनेक घरांची पडझड झाल्याने त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. विष्णुपुरी प्रकल्पात आवक वाढली असून, रात्रीतून धरण तुडुंब भरल्याने एक दरवाजा उघडून गोदापात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे गोदावरीही दुथडी भरून वाहत आहे.

सर्व शाळांना आज सुटी
हवामान खात्याने नांदेड जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, पुढील 24 तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना 22 जुलै रोजी सुटी देण्यात आली आहे.