दीपशिखा – श्यामसखी राधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जयश्री संगीतराव

महाभारताचा उल्लेख जसा कृष्णाविना अधुरा आहे त्याचप्रमाणे कृष्णाचा उल्लेख राधेविना अपूर्ण आहे. राधा आणि रुक्मिणी दोघीही लक्ष्मीचा अवतार असे म्हटले जाते. पण रुक्मिणी लक्ष्मीचे दैहिक रूप, तर राधा आत्मिक रूप मानले जाते. अशी ही राधा जी कृष्णाची खरंच कोण होती? मैत्रीण, सखी, की जिवाभावाची व्यक्ती? नाही सांगता येणार. कारण कृष्ण होता तिचा आत्मा आणि ती होती त्या आत्म्याची सांगाती. तिच्या रक्ताच्या कणाकणात कृष्ण सामावला होता आणि त्याच्याविना राधा अपूर्ण होती व आहे. तिचं अद्वैताशी असलेलं नातं तिच्याच शब्दांत…

पखरण प्राजक्ताची झाली

धुंद लहर गंधाची आली,

बेधुंद मन झालं

नकळत ओठी श्याम नाम आलं…

पावसाची सर येऊन गेली होती. प्राजक्ताच्या झाडाखाली शुभ्र पांढऱ्या फुलांचा सडा पडला होता. पांढरी शुभ्र फुलं त्याचे केशरी देठ शुद्धता आणि पावित्र्याचा संकेत देत होती. त्याच्या गंधाने तर राधेला श्यामच्या आठवणीत आकंठ बुडवलं होतं. मी राधा! खरंच कोण आहे मी? कृष्णाची मैत्रीण, सखी की जिवाभावाची व्यक्ती? नाही, मी त्याची कोण हे नाही सांगता येणार. पण कृष्ण तर माझा आत्मा आहे. माझ्या देहातील रक्ताच्या कणाकणात तो सामावला आहे. त्याच्याविना ही राधा अपूर्ण आहे. त्याच्याविना माझं अस्तित्वच नाही. ही धुंद गंध लहर मला नकळत त्याच्याकडे घेऊन गेली. राधा पुन्हा श्याममय झाली. आठवलं ते गोकुळ, गोप-गोपिकांची छेड काढायची, दही-दूध-तूप चोरून खायचं, बासरीची धून वाजवून राधेचं चित्त हरवून टाकायचं… हे सारं डोळ्यासमोर आलं. मी तर पुरती श्यामरंगी रंगले होते.

बालपण सरलं न सरलं तोच कृष्ण मथुरेला निघून गेला आणि ही राधा मात्र त्याच्या आठवणीत रमलेली. कधीतरी यमुनेवर गेलं की त्या जलात श्याम दिसतो. अगदी खांद्यावर हात ठेवल्याचा भास होतो. तर कधी पाव्याचे सूर ऐकू येतात आणि वाटतं मी स्वप्नात आहे की सत्यात? मला  तेव्हाही त्याचं मन वाचता यायचं. त्याची प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये काहीतरी कारण असायचं. तो रास ाढाrडा करायचा, गोप-गोपींना रमवून टाकायचा. क्षणभर का होईना, त्यांचा शीण दूर व्हायचा. यशोदा मय्याच्या मनात दडलेलं दुःख त्याने जाणलं होतं. त्याच्या संगोपनासाठी ती आपल्या कन्येला पारखी झाली होती, याची त्याला जाण होती. कृष्ण गोकुळ सोडून द्वारकेला निघून गेला. द्वारकाधीश झाला. रुक्मिणीपती झाला आणि मी राधा त्याच्या आत्म्यात रममाण झाली. त्याच्यात रमून गेली. त्याचा सहवास आठवत आनंदित होऊ लागली. प्राजक्ताचा सडा पडला असता प्रत्येक फूल कृष्णाच्या आणि रुक्मिणीच्या प्रेमाची, सत्यभामेच्या लाडिक रुसव्याची मला आठवण करून देत असे. त्याच्या श्वासाने गंधित झालेलं वारं माझ्यापर्यंत पोहोचत होतं. पूर्वी माझ्यासाठी वाजवलेले बासरीचे सूर कानी पडताच मन वेडपिसं होत त्याच्या डोईवरच्या मोरपिसासारखं हलकं होऊन त्याच्याभोवती घुटमळत राहतं. कृष्णाने त्याचं नाव माझ्यासवे जोडलं राधाकृष्ण, राधा दामोदर म्हणून भक्तीभावात रमवलं. जीवाशिवाचं नातं आहे आमचं. माझ्या सख्याला मी आयुष्यभराचा सहभाग कधीच नाही मागितला. मागितली होती फक्त त्याची पीडा, त्याचा त्रास आणि त्यालाही हे कळलं होतं. त्याला पोळलं की फोड माझ्या अंगावर उठावे, त्याला काटा बोचला तर सल मला व्हावी असंच वाटत होतं मला. म्हणूनच मी वचन घेतलं माझ्या सख्याकडून की त्याचं प्रत्येक पाऊल माझ्या हृदयातून जावं. तोही किती मनकवडा, त्याने त्याचं पाऊल इतकं नाजूक, नरम, सुकुमार बनवलं की बघून सगळेजण अचंब्यात पडायचे. पण हे कोडं काही सुटलं नाही. मला त्रास होऊ नये म्हणून त्याने आपलं पाऊल नाजूक ठेवलं. माझ्या अंतिम क्षणी त्याने पावा वाजवून माझी इच्छा पूर्ण केली आणि त्यानंतर त्याच्या पाव्याचे सूर गुंजलेच नाही कधी. मी इतकी भाग्यवान की भगवंताच्या गळ्यातले, श्वासातले सूर फक्त या राधेचे आहेत.

कृष्णावतारात अपूर्ण राहिलेला सहवास त्याने विठ्ठल अवतारात दिला, मला राहीच्या रूपात आणून. इथे मात्र मी रुक्मिणीचा रुसवा ओढवून घेतला. तिला वाटायचं आताही राधा आहेच माझ्या प्रेमात वाटेकरी. पण सखे अगं ‘राही रखुमाई राणी या सकळा’ असं जरी म्हटलं असलं, राणी म्हणून जरी मला मान मिळाला असला तरी ‘विठ्ठल रखुमाई’ असंच म्हटलं जातं. पतीच्या वामांगी म्हणजे डावीकडे हक्काच्या ठिकाणी, पत्नीच्या हक्काच्या बाजूला तुझंच स्थान आहे. ‘वामांगी रखुमाई’ असंच म्हटलं जातं. कृष्णावतारातही ते स्थान तुझंच होतं. इतकंच नाही तर तुळशीच्या रूपात त्याने तुला सदैव हृदयाशी ठेवलं. नको, नको माझा हेवा करू रुक्मिणी… मी फक्त त्याचा आत्मा आहे. भौतिक सुखापासून खूप दूर गेलेला. राधा-कृष्णाचं प्रेम हे प्राजक्तासारखं शुद्ध, सात्त्विक, सुगंधी आहे. स्वर्गातील प्राजक्त गोकुळात आला असता तर कदाचित त्यावर फक्त राधेचा हक्क असता. जाऊदे जळी, स्थळी त्याचा मला होणारा भास आणि त्याच्या पवित्र नावाबरोबर घेतलं जाणारं माझं नाव मला पावन करून गेलं. मला विठ्ठल अवतारात राही म्हणून नसतं जोडलं तरी माझा रुसवा नव्हता. राग नव्हता. कारण राधा ही भावना आहे, प्रेम आहे आत्म्याचं. आत्म्याशी झालेल पवित्र मिलन आहे. शृंगार म्हटलं जात असलं तरी त्यात सात्त्विकता आहे. पावित्र्य आहे आणि ते युगान् युगे राहणारच. सख्या कृष्णा, या तुझ्या राधेला काहीही नको. शुद्ध प्रेमाचं प्रतीक म्हणून मला राहू दे युगे युगे.

राधेची या प्रीत न्यारी

सर त्याची कुणा न येईल

 राधा नाम कृष्णा संगे

तिन्ही जगती अमर होईल…

[email protected]