अवती / भवती – श्रीमंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुहास मळेकर

व्यवसायाच्या निमित्ताने खूप भटकंती केली. जाहिरातविषयक फोटोग्राफी व्यवसायामुळे आणि विविध कन्सेप्ट घेऊन भटकंती करताना फाइव्हस्टार जीवन जितके जवळून बघता-आले तितकेच विविध राज्यांतील गावपाडय़ातले जीवनही जवळून बघता आले. अनेकदा वस्तीला राहायची वेळ आल्याने कुठेही ऍडजस्ट होण्याची सवय लागली. त्यानिमित्ताने हरतऱ्हेची संस्कृती-माणसं जवळून न्याहाळता आली. अलीकडेच एका समाजसेवी कलाकार मित्रासोबत जंगलपाडय़ात जाऊन एका छोटय़ा विश्वात फेरफटका मारून आलो. पैशाशिवाय सुंदर नैसर्गिक जीवन जगतात ही माणसं म्हणून त्याचं अप्रूप! अनुभवाने सांगतो, इथली श्रीमंती वेगळीच आहे. त्यांच्याकडे प्रेमाची, मायेची गडगंज संपत्ती आहे. त्यांच्याकडे पैसा नाही पण ते आनंदी समाधानी आहेत.

कुडाच्या ज्वारीच्या काडीनं विणलेल्या, शेणामातीनं लिपलेल्या झोपडय़ा, शेणानंच सारवलेलं अंगण. कातळातलं गोड पाणी आणि लिंबाची पाने कुस्करलेल्या चहाने तेव्हा त्यांनी आमचं स्वागत केलं. शेणा-मातीचा, चुलीचा गंध सगळीकडे भरून राहिला होता. तिथे कोंबडय़ा, बदकं, मांजरी, कुत्रे कदाचित साप, विंचू सगळे होते. दूरवर बिबटे, कोल्हे, रानमांजरही. मधाची चार फणी काढून आणलेली तिथे ठेवली होती. आंबे, काजू, करवंद, राजणं, खजूर, ताडगोळे, सोबत जोंधळा, तांदूळ, नाचणी इथलं मुख्य पीक आहे.

यांची भाषा अतिशय गोड-अवीट. संभाषणातून ही माणसे निरागस, मायाळू आहेत, जिवाला जीव देणारी आहेत हे लक्षात येत होतं. एका दिवसाचा परिचय असूनही जन्मोजन्मीची ओळख असल्यागत जाणवत होतं. तेव्हा सारखं वाटत होतं आपण जमिनीवर राहिलो तर माणसांची अशी नाती किती सहज जुळून येतात!

दिवसभराच्या मौजमस्तीनंतर अंधारून आलेलं कळलंच नाही आणि मग चुलीवरच्या यथेच्छ भोजनासह मनमोकळय़ा गप्पा झाल्या. रात्री अंगणात झोपण्यासाठी अंथरूण पडलेले असताना आम्हाला मध्यरात्री जंगलात फिरून येण्याची लहर आली. आम्ही यजमानांना सांगितले. त्यांनी मोठय़ा मुलाला सोबत देऊन जंगल फिरायला नेताना त्यांच्या भाषेत काहीतरी तंबी दिली. सोबत मजबूत काठी घेऊन मुलाने आम्हाला साधारण अर्धाएक किलोमीटर गर्द रानात आतमध्ये नेले. तिथे एका स्थानावरून त्याने यापुढे आपण जाऊ शकत नाही म्हणून मागे फिरवले. तेव्हा लक्षात आलं, पाहुण्यांना लहर आलीच आहे तर दुखवायचे नाही म्हणून बाबांनी त्याला एका मर्यादेत फिरवून आण सांगितले होते आणि त्याने त्यांच्या देवस्थानावर नेले होते. त्याच्या पुढे जंगलात कसलाही वारा लागू शकतो म्हणून त्यांनी काळजी घेतली होती.

तिथे वीज पोहोचलेली नसल्यामुळे संपूर्ण नैसर्गिक व्यवहार. वीज नसल्यामुळे साधी बॅटरी चार्ज होत नाही. कॅमेरा, मोबाईल चार्ज होत नाही. आपण मात्र तिथल्या वातावरणामुळे चार्ज होत राहतो. पक्की घरे नसूनही कुडामातीची घरे बांधून बारा महिने ऊन, वारा, पाऊस, थंडीपासून स्वतःसह पाळीव प्राण्यांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण-खाण्यापाण्याचे नियोजन ही निरक्षर माणसे कसे करतात हे बघून तुम्हांला आश्चर्य वाटेल.

तिथे जवळपास शाळा शिक्षण नसल्यामुळे त्यांची अक्षरांची खूप क्वचितच ओळख आहे. इथे पिकत असलेले जोंधळा, नाचणी, तांदूळ, नारळ, आंबे-ताडगोळय़ांसारखे हंगामी पीक, मध इत्यादी दूरवर आठवडय़ाच्या बाजारात बदल्यात देऊन ही माणसं डाळ, तेल, मीठ घेऊन कोसो दूर पायी आनंदाने घरी परततात. त्यांचे वार्षिक उत्सव असतात, करमणुकीचे कार्यक्रम असतात. त्याचा भरभरून आनंद घेतात.

जेव्हा आपण स्वतःला एकाकी, निराधार समजतो तेव्हा अशा ठिकाणी नक्की भेट द्यायला हवी. तुमच्या जिवाची माणसे तिथे भेटतात. तिथे गेल्यावर दोन गोष्टी प्रकर्षाने लक्षात येतात, तुमच्या प्रेमाची कुणाला तरी गरज आहे, आणि दुसरं म्हणजे, तुम्हाला त्यामुळे माणूस म्हणून जगण्याची जाणीव होते. म्हणून हक्काची माणसे जमवायला हवीत. पैसा असला नसला तरी विशेष फरक पडत नाही. चारी बाजूला डोळसपणे पाहिले की असे अनुभवास येते.