छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज इमारतीला गळती! शिवरायांच्या पुतळय़ासमोर, जिन्यावर टपकतेय पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक वारसा स्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीच्या दुरुस्तीवर चार महिन्यांपूर्वी केलेला कोटय़वधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. इमारतीच्या मुख्य इमारतीच्या घुमटाला असलेले लिकेज काढण्यासाठी रेल्वेने मार्चमध्ये दुरुस्तीचे काम केले होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुख्य घुमटातूनच पाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आणि संपूर्ण दगडी जिन्यावर टपकत आहे. त्यामुळे रेल्वेने कशा प्रकारची डागडुजी केली आहे, अशी चर्चा येथील अधिकारी-कर्मचारी आपापसात करत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज इमारतीचे बांधकाम संपूर्ण दगडी असून ते गॅथिक वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. ब्रिटिशांनी सुमारे 140 वर्षांपूर्वी बांधलेल्या इमातीत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. जागतिक वारसा स्थळ कमिटीने 2006मध्ये सदरची इमारत हेरिटेज वास्तू म्हणून जाहीर केली आहे. त्यामुळे सदर वास्तूचे जतन करण्यासाठी विविध संस्थांकडून सीएसआर अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जातो. तसेच रेल्वेही कोटय़वधी रुपयांचा खर्च करते. त्यानुसार सीएसएमटीच्या मुख्य इमारतीच्या घुमटाचे काम नुकतेच पूर्ण केले आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या पावसामुळे मुख्य घुमटालाच गळती लागली आहे.

पर्यटकांना गळतीचे दर्शन

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही इमारत हेरिटेज वास्तू असल्याने जगभरातून अनेक पर्यटक ही इमारत पाहण्यासाठी येतात. यावेळी पर्यटकांना इमारतीच्या बांधकामाचा उत्तम नमुना पाहतानाच ठिकठिकाणी पाण्याच्या धारा लागल्याचे चित्र दिसत आहेत. हेरिटेज वॉकमध्ये गळतीचे दर्शन घडत असल्यामुळे पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.