
जम्मू कश्मीरमध्ये गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, चाकूहल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. यानंतर श्रीनगर, जम्मू-कश्मीरमध्ये धारदार शस्त्रांवर बंदी घालण्यात आली आहे. धारदार शस्त्रे येथे खरेदी-विक्री करता येणार नाहीत. सार्वजनिक ठिकाणीही लोकांना अशी शस्त्रे बाळगता येणार नाहीत. ज्यांच्याकडे ही शस्त्रे आहेत त्यांनी ती ३ दिवसांच्या आत जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करावीत. श्रीनगरचे जिल्हाधिकारी मोहम्मद एजाज असद यांनी हा आदेश जारी केला आहे.
श्रीनगर शहरात नुकत्याच झालेल्या चाकूहल्ल्याच्या घटना पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीनगर पोलीस अधिकार्यांनी सांगितले की, कमरवारी, बेमिना, क्रालपोरा, बटमालू, नोहट्टा, कोठीबाग आणि रामबाग यासह अनेक भागात चाकूहल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. चाकूचा धाक दाखवण्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या घटना रोखण्यासाठी धारदार शस्त्रांवर बंदी घालणे आवश्यक झाले आहे. या आदेशानुसार, ज्या शस्त्राची ब्लेड 9 इंचांपेक्षा जास्त लांब किंवा 2 इंचांपेक्षा जास्त रुंद असेल अशी शस्त्रास्त्रे बाळगणे हा शस्त्र कायदा 1959 नुसार कायदेशीर गुन्हा आहे. त्याच वेळी, त्यांचा उपयोग शेती, उद्योग आणि वैज्ञानिक कार्यांसाठी केला जाऊ शकतो.
बारा बलुतेदारांना या निर्णयातून सूट
जम्मू कश्मीरमधील या निर्णयात अत्यावश्यक सेवा करणार्या संस्था, शेतकरी आणि बारा बलुतेदारांना सूट देण्यात आली. यामध्ये मोठमोठे चाकू, तलवारी, बॉक्स कटर आणि रेझरसह सर्व धारदार शस्त्रांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, ही बंदी कायदेशीर संस्था आणि व्यवसायांना लागू होणार नाही. शेतकरी, सुतार, कसाई, आचारी आणि इलेक्ट्रिशियन त्यांच्या कामासाठी अशी शस्त्रे ठेवू शकतील. मात्र त्यांना व्यवसाय क्षेत्राच्या बाहेर हे वापरता येणार नाही.
























































