राधानगरीतील केळोशी बुद्रूक प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’, प्रकल्प अनेक वर्षांपासून बेवारस स्थितीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केळोशी बुद्रूक (ता. राधानगरी) येथील लोंढानाला लघुपाटबंधारे प्रकल्प रविवारी सकाळी पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे धरणाच्या उजव्या बाजूच्या सांडव्यातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. पण 2012 या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असूनही अद्यापि जलसंपदा विभागाकडे याचे हस्तांतरण न झाल्याने हा प्रकल्प बेवारस स्थितीत आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिह्यात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे तालुक्यातील धरण व छोटय़ा-मोठय़ा प्रकल्पांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत आहे. गतवर्षी पेक्षा यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला. पण गेल्या तीन दिवसांपासून पावसाने चांगला जोर धरला आहे. ‘तरण्या’ पावसाचा शेवट व ‘म्हाताऱया’ पावसाची दमदार एंट्री झाल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे.

लोंढानाला मध्यम प्रकल्प हा तुळशी जलाशयासाठी मोठे वरदान ठरत आहे. तुळशी जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यामध्ये या प्रकल्पाचा सिंहाचा वाटा आहे. दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू झाल्याने प्रकल्प रविवार सकाळी पूर्ण क्षमतेने भरला. या प्रकल्पात 1162.78 सहस्त्र्ा घनमीटर इतका पाणीसाठा होतो. या जलाशयातून पाणी तुळशी जलाशयात मिळत असल्याने तुळशी जलाशयाच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे.

हा प्रकल्प पूर्ण होऊन 10 वर्षे उलटली असली तरीही हा प्रकल्प बेवारस स्थितीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रकल्पाचे काम समोरील दगडी पिचिंग वगळता 2012 साली पूर्ण झाले. या प्रकल्पामुळे केळोशी, कुंभारवाडी, सुतारवाडी, पिलावरेवाडी, देऊळवाडी, वळवंटवाडी, खामकरवाडी, अवचितवाडी आदी गावांच्या सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र अद्यापि हा प्रकल्प पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित न झाल्यामुळे या प्रकल्पाचा ताबा आजही संबंधित ठेकेदाराकडे असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकल्पाचे दगडी पिचिंगचे काम अपुरे असून, अतिवृष्टी काळात येथे अचानक पावसाचा जोर वाढला आणि पाणीपातळी वाढली तर प्रकल्पाला धोका निर्माण होऊ शकतो. याची पाटबंधारे विभाग व आपत्कालीन पूर नियंत्रण कक्षाला पुसटशी कल्पना किंवा फिकीर नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. संबंधित ठेकेदार व जलसंपदा विभागाने पूरपरिस्थितीत या प्रकल्पाची काळजी घेणे गरजेचे असताना हा प्रकल्प बेवारस स्थितीत आहे. याबाबत तुळशी धरणाच्या शाखा अभियंता अंजली कारेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हा प्रकल्प आपल्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगितले.

एका रात्रीत सांडव्याची खुदाई

2012 साली या प्रकल्पाच्या सांडव्याचे काम अपुरे असताना हा प्रकल्प भरला होता. त्यावेळी प्रकल्प कोणत्याही क्षणी फुटणार, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा संबंधित ठेकेदाराने एका रात्रीत सांडव्याची खुदाई केली होती. त्यानंतर तेथे कोणतेही काम करण्यात आलेले नाही. सध्या बेवारस स्थितीत असलेल्या प्रकल्पाची आपत्कालीन परिस्थितीत देखभाल करण्यासाठी जलसंपदा विभागाने कर्मचाऱयांची नियुक्ती करावी, अशी मागणी केळोशी बुद्रूक व धामोड परिसरातून व्यक्त होत आहे