
वाकोला जंक्शन ते कपाडिया नगरदरम्यानच्या उन्नत मार्गाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून कामातही दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला पुन्हा मुदतवाढ देण्याचे कारण काय, अशी विचारणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार संजय पोतनीस यांनी आज सभागृहात केली. औचित्याचा मुद्दा मांडताना ते म्हणाले की, सांताक्रुझ चेंबूर लिंक रोडवर एमएमआरडीमार्फत उन्नत मार्ग बांधण्याचे काम सुरू आहे.
तीन महिन्यांपूर्वी बांधलेल्या उन्नत मार्गावर पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत. वांद्रे कॉम्प्लेक्समध्ये ट्रेड सेंटरमध्ये बांधलेल्या उड्डाणपुलाचा भाग मागील वर्षी कोसळून त्यात चौदा जण जखमी झाले होते. मी स्वतः कारमधून प्रवास करताना उड्डाणपुलावरून लोखंडी तुकडा पडला. यामध्ये माझ्या कारचे नुकसान झाले. या भागातील उन्नत्त मार्गाच्या कामाचा निकृष्ट दर्जा, सुरक्षेचा अभाव, दिरंगाईबाबत वारंवार तक्रारी केल्या. प्रकल्पाच्या खर्चात वाढ होऊनही कोणतीही कारवाई न करता मेसर्स जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर पंपनीला तीनवेळा का मुदतवाढ दिली, अशी विचारणा संजय पोतनीस यांनी केली.






















































