मिंधेंनी गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर फेकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील गिरणी कामगारांना मुंबईत घर देण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरात जागाच शिल्लक नसल्याची स्पष्ट कबुली गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत दिली. त्यामुळे गिरणी कामगारांचे मुंबईतील घरांच्या स्वप्नांचा राज्य सरकारने चक्काचूर केला आहे. आता गिरणी कामगारांना मुंबईबाहेरील घरासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांबाबत भाजपचे सुनील राणे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना गृहनिर्माणमंत्री सावे यांनी मुंबईत एकूण 58 बंद अथवा आजारी गिरण्यांपैकी 32 खासगी मालकीच्या, 25 राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या आणि महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या एका गिरणीचा समावेश आहे. या 58 गिरण्यांपैकी 11 गिरण्यांमध्ये पुनर्विकासाचा प्रस्ताव मंजूर नसल्यामुळे म्हाडाचा वाटा निश्चित झालेला नाही. उरलेल्या 47 गिरण्यांपैकी 10 गिरण्यांमध्ये म्हाडाचा वाटा शून्य आहे. सद्यस्थितीमध्ये 33 गिरण्यांच्या 13.78 हेक्टर जमिनीचा प्रत्यक्ष ताबा म्हाडाला प्राप्त झालेला आहे. उर्वरित चार गिरण्यांचा मिळून 10 हजार 192 चौ. मी. जमिनीचा वाटा निश्चित झालेला आहे, मात्र अद्याप त्या जमिनाचा ताबा म्हाडास हस्तांतरित झालेला नसल्याचे स्पष्ट केले.

ठाण्यात जागा देणार
मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत जागा उपलब्ध नसल्याने त्यांना सवलतीच्या दरात म्हाडामार्फत घरे बांधण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील 43.45 हेक्टर शासकीय जमिनी विनामूल्य उपलब्ध करून देण्याची बाब राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचे सांगितले. या जमिनीपैकी 21.88 हेक्टर जमीन म्हाडामार्फत गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यास सुयोग्य आहे, असा अहवाल नुकताच ठाण्याच्या जिल्हाधिकाऱयांकडून प्राप्त झाला असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी दिली.