मुद्रा – पारतंत्र्यात गौरव; स्वातंत्र्यात उपेक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>चंद्रशेखर दाभोळकर

मुंबईचे आद्य शिल्पकार, भारतीय रेल्वेचे जनक जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांची उद्या 158 वी पुण्यातिथी आहे. नानांनी मुंबई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. मुंबईला नवी ओळख देणाऱया नानांनी केलेल्या कामाच्या पाऊलखुणा आजही दिमाखात उभ्या आहेत.

दातृत्वं प्रियवत्तृत्वं धीरत्वमुचितज्ञता।
अभ्यासेन न लभ्यन्ते चत्वार: सहजा: गुणा:।।

दान देण्याचा स्वभाव, गोड बोलणे, धैर्य आणि काळवेळ जाणणे या चार गोष्टी अभ्यासाने मिळत नाहीत. हे गुण स्वाभाविकपणे माणसात आलेले असतात. या अंगीकृत गुणांचे महत्त्व जाणून ज्यांनी समाजोद्धारासाठी त्याचा उपयोग केला ते म्हणजे मुंबईचे आद्य शिल्पकार, भारतीय रेल्वेचे जनक जगन्नाथ तथा नाना शंकरशेट होत. नानांचा बॉम्बे टाऊन हॉलमध्ये एक पुतळा विराजमान आहे. विशेष म्हणजे त्यांचा कार्यकर्तृत्वाचा गौरव म्हणून ब्रिटिशांनीच तो तयार केला होता. एकोणिसाव्या शतकात स्वातंत्र्य गमावल्यानंतर हिंदुस्थानात राष्ट्रवाद निर्माण करण्यासाठी अपार कष्ट घेतलेल्या थोर महापुरुषांमध्ये नाना शंकरशेट यांचा समावेश होता. मुंबई शहराच्या विकासासाठी तसेच भारतीय नागरिकांच्या हक्कांसाठी नानांनी आयुष्यभर ब्रिटिश सरकारशी यशस्वी लढा दिला.

हिंदुस्थानींमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, त्यांचे जीवन सुख-समृद्धीचे व्हावे आणि देशाची मान उंचावली जावी हा उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून नानांनी सामाजिक कार्याचा वसा हाती घेतला व स्वत:साठी जीवनकार्याचा इतरांपेक्षा वेगळा असा पर्याय निवडला. नानांनी इंग्रजी शिक्षण घेतले होते. त्याचा ब्रिटिशांशी प्रभावीपणे मुद्देसूद संवाद साधण्यास महनीय उपयोग झाला. जोपर्यंत हिंदुस्थानी इंग्रजी शिकत नाहीत तोपर्यंत ते ब्रिटिशांशी स्पर्धा करू शकणार नाहीत असे त्यांचे मत होते. ते शिक्षणाच्या प्रसारात गुंतले. बॉम्बे प्रांताचा तत्कालीन गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा हिंदुस्थानी लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याच्या बाजूने होता आणि त्यासाठी त्याचे प्रयत्नही सुरू होते, परंतु श्रीमंत नागरिकांचा पाठिंबा मिळेपर्यंत त्याला विशेष यश मिळू शकले नाही. म्हणून त्याने मुंबईतील धनाढय़ मंडळींची बैठक बोलावली. त्यात त्यांनी आपली योजना त्यांच्यासमोर ठेवली. या कार्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याची विनंती केली. पत्राद्वारे संवाद साधून अनेकांकडून पैसे गोळा केले. या कामाचे नेतृत्व आपोआप नानांकडे आले. नानांच्या नेतृत्वाखाली बॉम्बे नेटिव्ह स्कूल आणि स्कूल बुक सोसायटीची स्थापना झाली.

नानांनी पेरलेले ज्ञानाचे बीज वेळ येताच अंकुरले आणि एल्फिन्स्टन हायस्कूल आणि एल्फिन्स्टन कॉलेजचा जन्म झाला. नंतर सरकारने शिक्षणावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मंडळ स्थापन केले, ज्याच्या कार्यामुळे पुढे मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. नाना बालगुन्हेगारांच्या सुधारण्यासाठी शाळा सुरू करण्याच्या विचारात होते.

आजकाल भाषेच्या प्रश्नावर अनेक मतभेद आणि भांडणे पाहायला मिळतात. या समस्येची जाणीव नानांना शंभर वर्षांपूर्वी झाली होती. इंग्रजीबरोबरच मराठी आणि संस्कृतही शिकले पाहिजे, मात्र शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असले पाहिजे यासाठी ते आग्रही होते. ज्ञानाच्या सूर्याची किरणे पसरवण्यासाठी मातृभाषेचा जास्तीत जास्त वापर करणे प्रत्येकाचे कर्तव्यच असल्याचे त्यांचे मत होते. शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषेची उपलब्धता न झाल्यामुळे सर्वसामान्यांना ती मिळू शकणार नाही, शिक्षण आणि मातृभाषादेखील समृद्ध होणार नाहीत अशी भीती त्यांना होती. ’संस्कृत भाषा ही हिंदुस्थानी संस्कृतीची खाण आणि सर्व भाषांची जननी आहे. हिंदू धर्माचे धर्मग्रंथ, वेद, पुराणे, रामायण, महाभारत इत्यादी संस्कृतमध्येच आहेत. लोकांना संस्कृत भाषा अवगत असावी’, अशी नानांची धारणा होती. त्या पारतंत्र्याच्या काळात त्यांनी संस्कृतला प्रतिष्ठा मिळवून दिली. आजतागायत मुंबई विद्यापीठातर्फे जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती संस्कृत विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱया विद्यार्थ्याला दिली जाते.

नानांनी शैक्षणिक क्षेत्रातील कामाबरोबरच मुंबई शहराच्या सर्वांगीण विकासासाठीही महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यावेळी जे ब्रिटिश अधिकारी होते, त्यांना शहरी सुधारणेच्या कामात रस होता, परंतु त्या सुधारणेचे क्षेत्र आपल्या स्वकियांपुरतेच मर्यादित ठेवून बाकीच्या लोकांचे आरोग्य, पाणी, वीज इत्यादींकडे ते फारसे लक्ष देत नसत, त्याचे नानांना वाईट वाटे. म्हणून वेळोवेळी ब्रिटिशांच्या ही बाब लक्षात आणून देऊन त्यांनी वस्तीतील घाण, अंधार, पिण्याच्या पाण्याची कमतरता, अरुंद रस्ते इत्यादी दूर करण्याचा स्वत:च प्रयत्न सुरू केला. हिंदुस्थानींसाठी बाग, तलाव, दवाखाना, वाचनालय, नाटय़गृह इत्यादींच्या उभारणीत त्यांनी तन, मन आणि धन गुंतवले.

नानांनी हिंदुस्थानींच्या राजकीय हक्कांसाठीही लढा दिला. त्या काळात न्याय देण्यासाठी सेशन्स कोर्टात बसण्याचा अधिकार हिंदुस्थानी लोकांना नव्हता. हिंदुस्थानींना हा अधिकार मिळविण्यासाठी नानांनी आपल्या वाडय़ात मुंबईतील प्रतिष्ठित व्यक्तींची बैठक आयोजित केली व यामध्ये लोकांचे हक्क आणि सर्व राजकीय परिस्थितीवर विचारविनिमय करण्यात आला. त्यावेळी कोणतीही संघटना नव्हती, जी हिंदुस्थानींच्या हक्कांसाठी लढेल. त्याच वर्षी नाना शंकरशेट यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील नागरिकांच्या बैठकीत बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली. ही संस्था जनतेच्या पारी दूर करण्यासाठी, हिंदुस्थानातील जनतेला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी काम करत असे. देशात राजकीय चळवळीला जन्म देणारी पहिली संस्था स्थापन झाली. नाना सलग बारा वर्षे या संघटनेचे अध्यक्ष होते. फिरोजशहा मेहता, बद्रुद्दीन तयबजी आदी नेत्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन असे त्याचे नाव बदलून या संघटनेची पुढे धुरा सांभाळली.
नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी विविध संस्था स्थापन करण्यात सिंहाचा वाटा घेत दैवी शक्ती लाभलेल्या या महात्म्याने भविष्याची दूरदृष्टी ठेवून सर्वसमावेशक प्रगती साधली. हिंदुस्थानात दळणवळणाचे मुख्य साधन असलेल्या रेल्वेचे नाना जनक आहेत. रेल्वे कचेरीसाठी स्वत:चा वाडा उपलब्ध करून देणारा, फक्त 62 वर्षांचे आयुष्य लाभलेले नाना त्यांच्या अफाट कार्यामुळे अजरामर झाले आहेत. सामान्य जनतेला नानांच्या आदर्शवत, अनुकरणीय कार्याचे महत्त्व पटले असले तरी अजूनही त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस अशा नामकरणाची सरकार दरबारी दिरंगाई होतच आहे. वडाळा येथील स्मारकासाठी प्रदान केलेल्या भूखंडावरील स्मारकास होत असलेला विलंबदेखील वेदनादायी आहे.

पारतंत्र्य केव्हाच संपून आपण स्वतंत्र झालो आहोत. त्यामुळे ब्रिटिश राज्यकर्त्यांची आता मागणीच्या प्रस्तावाला संमती मिळवण्याची आवश्यकता नाही याचा शासनकर्त्यांना कदाचित विसर पडलाय की काय असेच म्हणावे लागेल. कारण स्वातंत्र्यपूर्व काळात नानांच्या कार्याची ब्रिटिशांनी घेतलेली दखल स्वातंत्र्य काळात का घेतली जात नाही, हे प्रश्नचिन्हच आहे. 31 जुलै 2023 रोजी नाना शंकरशेट यांची 158 वी पुण्यतिथी आहे. या दिवसाचे औचित्य साधून आनंदाची घोषणा सरकारकडून व्हावी हीच तमाम नानाप्रेमी जनतेची अपेक्षा आहे!

– [email protected]
(लेखक ना. जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठानचे संयुक्त चिटणीस आहेत)