सेलेब्रिटी चॉइस- विचारांचं संचित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>केतकी पालव 

शाळेत असताना अभ्यासाच्या पुस्तकांशिवाय काहीच वाचलं नाही. माझा वाचनप्रवास हा दहावीच्या सुट्टीपासून सुरू झाला. तेव्हा पहिल्यांदा वाचलेलं ‘स्वामी’ हे पुस्तक आजही माझ्या आवडत्या, पुन्हा वाचावं असं वाटणाऱया पुस्तकांच्या यादीत आहे. यानंतर वपुंचं ‘पार्टनर’, ‘युगंधर’, ‘मृत्युंजय’ अशी सगळय़ांना आवडणारी पुस्तकं या यादीत आलीच. कॉलेजात गेल्यानंतर चेतन भगत या लेखकाचं गारुड होतं. ते तेवढय़ापुरतंच होतं खरं तर. तेव्हा ‘फाइव्ह  पॉइंट समवन’, ‘वन नाइट इन कॉल सेंटर’, ‘थ्री मिस्टेक्स  ऑफ माय लाइफ’ ही पुस्तकं वाचली. इंग्रजी वाचनाकडे कल वाढत असताना पाउलो कोएलो यांची ‘ब्रिडा’, ‘अलकेमिस्ट’, ‘इलेव्हन मिनिट्स’, ‘द मॅन्युएल ऑफ द वॉरियर ऑफ लाइट’ अशी बरीच पुस्तकं वाचली.

पुढे थिएटर आर्टस्मध्ये शिकताना आपण का वाचलं पाहिजे आणि काय वाचलं पाहिजे हे हळूहळू कळू लागलं. त्या वेळी नाटकांवर आधारित कितीतरी पुस्तकं वाचली. विजय तेंडुलकरांची ‘कमला’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘गिधाडे’, ‘सखाराम बाइंडर’, ‘अशी पाखरे येती’ ही नाटकं, पुलंची ‘बिनपैशांचा तमाशा’, ‘अंमलदार’, ‘ती फुलराणी’, ‘सुंदर मी होणार’ अशी बरीचशी नाटकं वाचली. त्या काळात आणि नंतरही आवडलेला लेखक म्हणजे सचिन कुंडलकर. एका वेगळय़ा  चौकटीतून जगाकडे बघायला शिकवणारा लेखक असं मी त्यांच्या बाबतीत म्हणेन. ‘कोबाल्ट ब्ल्यू’, ‘छोटय़ाश्या सुट्टीत’, ‘पूर्णविराम’ ही आवडलेली पुस्तकं नाटकं आहेत. असाच आणखी एक लेखक म्हणजे मोहन राकेश. त्याचं ‘आषाढातील एक दिवस’, ‘लहरोंकी रानी’, ‘आधेअधुरे’ ही आवडती नाटकांवर आधारित पुस्तकं. धर्मवीर भारती यांची ‘अंधा युग’, ‘कनुप्रिया’ ही माझी अत्यंत आवडती पुस्तकं आहेत.

माझं आवडतं आणि पुन पुन्हा वाचावं असं वाटणारं पुस्तक म्हणजे ‘द फाऊंटनहेड.’ आयन रँड यांचं हे पुस्तक. तसंच मला फिलॉसॉफिकल, सकारात्मक ऊर्जा देणारी पुस्तकं वाचायला आवडतात. यात ओशोंच्या पुस्तकांचा उल्लेख आवर्जून करायला हवा. त्यांच्या सर्वच पुस्तकांमधून आपल्याला काहीतरी नक्कीच मिळतं. त्यांची छोटय़ा छोटय़ा कथांमधून, सोप्या भाषेतून तत्वज्ञान मांडत असणारी पुस्तकं आवडतात. भालचंद्र नेमाडेंच्या पुस्तकांकडे मी थोडं उशिरा वाचायला घेतली, पण ‘कोसला’ वाचल्यानंतर मी अधाशासारखी त्यांची पुस्तकं वाचून काढली. ‘झूल’, ‘जरिला’, ‘बिढार’, ‘हिंदू’ अशी त्यांची बरीच पुस्तकं वाचली. त्यातही ‘कोसला’ माझं आजही तितकंच आवडीचं आहे.

मधल्या काळात सुधा मूर्ती यांची पुस्तकं वाचण्याचं वेड लागलं. साधंसोपं असं लेखन असलेली ‘डॉलर बहू’, ‘तीन हजार टाके’, ‘वाइज अॅण्ड अदरवाइज’, ‘बकुळा’ ही पुन पुन्हा वाचावी अशी वाटणारी पुस्तकं आहेत. आर. के. नारायण यांची ‘द डार्क रूम’, ‘द इंग्लिश fिटचर’ ही माझी आवडती पुस्तकं. गिरीश कर्नाड, सतीश आळेकर या प्रयोगशील नाटय़लेखकांची सगळीच पुस्तकं वाचायला आवडतात.

कोणतंही पुस्तक आपल्याला काहीतरी देतं. अधिक प्रगल्भ करतं. वेगळा अनुभव देतं. हे विचारांचं संचित देणारा हा वाचन प्रवास व्यक्ती म्हणून, कलाकार म्हणून मला समृद्ध करणारा आहे.

शब्दांकन : शुभांगी बागडे