
>>दुष्यंत पाटील
एकोणिसाव्या शतकात रशियात संगीतात राष्ट्रवाद दिसावा याकरिता एकत्रित प्रयत्न करणारे पाच संगीतकार म्हणजे ‘दि माइटी फाईव्ह’. यांचं नेतृत्व करणारा मिली बालाकिरेव रशियातल्या लोकसंगीतातून चाली घेत असे. तिथल्या पर्वतराजीतील स्थानिक जमातीच्या नृत्यासाठी वापरल्या जाणाऱया ‘इस्लामी’ या चालीचा वापर बालाकिरेवने संगीतरचनेत केला आणि ही रचना संगीतात अजरामर झाली.
एकोणिसाव्या शतकात युरोपमधल्या संगीतात ‘राष्ट्रवाद’ दिसू लागला. या काळात तिथली काही राष्ट्रं स्वातंत्र्यासाठी लढत होती. त्यांचं राष्ट्रप्रेम संगीत रचनांमध्येही दिसायला लागलं होतं. आपल्या देशातल्या लोकसंगीताचा, पारंपरिक नृत्यातल्या संगीताचा प्रभाव त्यांच्या संगीत रचनांमध्ये दिसायला लागला. ‘ऑपेरा’मध्ये आपल्या देशातल्या विषयांशी कथानकं यायला लागली. युरोपमधल्या प्रमुख संगीताच्या प्रवाहापेक्षा हे थोडंसं वेगळं संगीत होतं.
संगीतातला हा राष्ट्रवाद रशियातही दिसत होता. रशियामध्ये पाच मोठे संगीतकार मूळचं ‘रशियन’ असणारं संगीत क्लासिकल संगीतात आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न करत होते. या पाच संगीतकारांना ‘दि फाईव्ह’ किंवा ‘दि माइटी फाईव्ह’ या नावाने ओळखलं जातं. या पाच संगीतकारांचं नेतृत्व करत होता मिली बालाकिरेव. ही सारी मंडळी आजच्या ‘सेंट पिटर्सबर्ग’ या शहरातून काम करायची.
बालाकिरेवची खासियत म्हणजे तो रशियातल्या लोकसंगीतातून काही चाली घ्यायचा आणि त्यातून संगीताने समृद्ध अशा क्लासिकल संगीतात मोडणाऱया संगीतात रचना करून दाखवायचा. ‘दि फाईव्ह’चं नेतृत्व करत असला तरी त्याने बरीच वर्षं एकटय़ाने काम केलं होतं. खरं तर ‘दि फाईव्ह’मध्ये संगीतातलं व्यवस्थित शिक्षण घेतलेला तो एकटाच होता.
1860 च्या दशकात सुट्टी घालवण्यासाठी बालाकिरेवने कॉकेशस पर्वताच्या उत्तर भागाला भेट दिली. अर्थातच तो रशियाचा भाग होता. तिथल्या निसर्गसौंदर्याने तो भारावून गेला होता. तिथे राहणाऱया स्थानिक जमातींच्या लोकांचा त्याच्यावर प्रभाव पडला होता. या लोकांच्या पारंपरिक संगीतामध्ये बालाकिरेवला रस होता. स्थानिक जमातीच्या युवराजाशी बालाकिरेवची ओळख झाली. हा युवराज वरचेवर बालाकिरेवला भेटायला यायचा आणि जमातीच्या लोकसंगीतातला काही भाग त्याच्या वाद्यावर वाजवून दाखवायचा. त्याचं वाद्य काहीसं व्हायोलिनसारखं होतं.
सुट्टीमध्ये ऐकायला मिळणाऱया लोकसंगीतापैकी बरंचसं संगीत बालाकिरेव लिहून ठेवायचा. युवराजाने वाजवलेल्या संगीतापैकी एक चाल त्याला सारखी भुरळ घालत होती. ही चाल म्हणजे त्या जमातीच्या एका नृत्यासाठी वापरलं जाणारं संगीत होतं. या नृत्यसंगीताचं नाव होतं ‘इस्लामी’. बालाकिरेवला हे संगीत इतकं आवडलं होतं की, भविष्यात एखाद्या रचनेत यातली चाल वापरण्याचे विचार त्याच्या डोक्यात एकसारखे घोळत होते.
‘इस्लामी’चं संगीत डोक्यात ठेवूनच बालाकिरेव सुट्टीहून परतला. मॉस्कोमध्ये आल्यानंतर तो विख्यात संगीतकार चायकॉव्हस्कीच्या घरी वरचेवर जायचा. एकदा चायकॉव्हस्कीच्या घरी त्याने आर्मेनियामधल्या एका अभिनेत्याला एक गीत गाताना पाहिलं. आज स्वतंत्र देश असणारा आर्मेनिया त्या काळात रशियाचाच भाग होता. ‘डी लाझार’ असं या अभिनेत्याचं नाव होतं. ािढमियामधल्या बऱयाचशा लोकांना हे प्रेमगीत ओळखीचं होतं असं त्या अभिनेत्याने बालाकिरेवला सांगितलं. आज पोनचा भाग असणारा ािढमिया त्या काळात रशियाचाच भाग होता. हे गीतही बालाकिरेवला आवडलं होतं.
1869 मध्ये बालाकिरेवनं ‘इस्लामी’ ही पियानोसाठी रचना केली. एरवी संगीत रचना करण्यासाठी बरीच वर्षे घेणाऱया बालाकिरेवने ही संगीत रचना मात्र एका महिन्यातच पूर्ण केली होती. या संगीत रचनेत सुरुवातीला सुट्टीमध्ये कॉकेशस पर्वतावर ऐकलेल्या ‘इस्लामी’ संगीतातला भाग येत होता. संगीत रचनेतला हा भाग जलद गतीमध्ये येत होता. यानंतर या रचनेत आर्मेनियन अभिनेत्याने गायलेल्या गीतामधला भाग येत होता. हा मंद गतीमध्ये येत होता. शेवटी पुन्हा एकदा जलद गतीतला मूळच्या ‘इस्लामी’ रचनेतला भाग येत होता. बालाकिरेवने स्वतची कल्पकता वापरत ही रचना एका वेगळ्या उंचीवर आणून ठेवली होती.
‘इस्लामी’ ही संगीत रचना प्रचंड गाजली. ही रचना ऐकायला जितकी सुंदर होती तितकीच वाजवायला कठीण. पियानोवर प्रभुत्व असणारे युरोपमधले बरेचसे पियानोवादक आपलं कौशल्य दाखवण्यासाठीही बऱयाचदा कार्पामांमध्ये हे रचना सादर करायचे. नंतरच्या काळात ऑर्केस्ट्रासाठीही या रचनेची अॅरेंजमेंट झाली. गंमत म्हणजे उत्तर कॉकेशस पर्वतावरच्या जमाती ‘इस्लामी’च्या मूळच्या संगीतावर आजही पारंपरिक नृत्य करताना दिसतात. बालाकिरेवचं ‘स्लामी’ संगीत आणि या लोकांचं पारंपरिक ‘इस्लामी’ संगीत यात थोडासा फरक आहे असं आज आढळून आलंय. कसंही असलं तरी ‘इस्लामी’ ही रचना पाश्चात्त्य संगीतात अजरामर झाली असंच म्हणावं लागेल.
पर्वतावर राहणाऱ्या एखाद्या जमातीच्या लोकसंगीतापासून एक महान संगीत रचना कशी झाली ते पाहण्यासाठी आपण एकदा तरी यूटय़ूबवर जाऊन बालाकिरेवची ही इस्लामी संगीतरचना ऐकायलाच हवी!




























































