आमच्या काही कलाकृती विकल्या गेल्या, पण नव्या कलाकृती निर्माण करण्याची हिंमत आहे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या जे काही चालले आहे ते मोठे विपरित आहे. कुणाचा फोटो कुणाबरोबर कधी येईल हे आणि फोटोमधील एखादा माणूस कधी गायब होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे मीही थोडा काळ फोटोग्राफीही थांबवली आहे. असे सांगतानाच आपण कलाकृती विकत घेऊ शकतो, पण कला नाही. आमच्यातल्या काही कलाकृती विकल्या गेल्या. पण कलेतून नव्या कलाकृती निर्माण करण्याची हिंमत आमच्यात आहेत, अशी फटकेबाजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडिया आणि भारतीय विद्या भवन यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथील सेक्टर 30 मधील भारतीय विद्या भवनच्या केंद्रात 21 व्या आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात 43 देशांमधील 219 छायाचित्रकारांनी टिपलेली निवडक 76 छायाचित्रे ठेवण्यात आली आहेत. या छायाचित्रांची निवड 2 हजार 300 छायाचित्रांमधून करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी शिवसेना नेते सुभाष देसाई, दिग्दर्शक संदीप पाटील, सोसायटीचे चेअरमन एम. एन. रामचंद्रन, अध्यक्ष आनंद निरगुडे, सुनील व्यास, राजेंद्र वाघमारे, शशांक नरसाळे, शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते.

मानद सदस्यत्व बहाल
फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने उद्धव ठाकरे यांना मानद सदस्यत्व देऊन गौरवण्यात आले. हा गौरव सोसायटीचे चेअरमन एम. एन. रामचंद्रन यांच्या हस्ते करण्यात आला. छायाचित्र प्रदर्शनात ठेवलेल्या सर्वच छायाचित्रांचे उद्धव ठाकरे यांनी बारकाईने निरीक्षण केले आणि हे छायाचित्र कुठे टिपले याबाबत माहिती करून घेतली.