प्रासंगिक – बहुआयामी साहित्यिक व लोकशाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. पंजाबराव मोरे

महाराष्ट्रातील  शाहीर आणि विविध लोककला जपणाऱ्या कलावंतांनी लोककलांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांचे मनोरंजन करून त्यातून लोकशिक्षणाची महत्त्वाची कामगिरी पार पाडली आहे. दिवसभर राबणाऱ्या रांगडय़ा मनाला लोककलांनी जणू काही भुरळच घातली होती. त्यातच सगनभाऊ, होनाजी बाळा, भाऊ फक्कड, पठ्ठे बापुराव, अनत फंदी, द. ना. गव्हाणकर, अमरशेख, भीमराव कर्डक, वामनदादा कर्डक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या शाहीरांनी अन्याय, अनिष्ट चालीरीतींविरोधात समाजमन पेटवले. देशभक्तीसाठी स्फुल्लिंग चेतवले. यामध्ये अण्णाभाऊ साठे हे बहुआयामी शाहीर म्हणावे लागतील. कारण त्यांनी पोवाडा, गीते, लावणी, छक्कड, कथा, नाटक, लोकनाटय़ आणि  कादंबरी या सर्व प्रकारचे लिखाण केले. अवघ्या दीड दिवसाची वर्गाबाहेरची शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंनी 11 पोवाडे, 14 लोकनाटय़े, एक नाटक, 14 कथासंग्रह, 32 कादंबऱ्या आणि एक प्रवासवर्णन अशी हिमालयाएवढी साहित्य शिदोरी पुढील अनेक पिढय़ांसाठी वाढून ठेवली आहे. त्यांच्या ‘वैजयंता’, ‘आवडी’, ‘माकडीचा माळ’, ‘चिखलातील कमळ’, ‘वारणेचा वाघ’, ‘अलगुज’ आणि ‘फकिरा’ या गाजलेल्या वास्तववादी कादंबऱ्यांवर ‘वैजयंता’, ‘टिळा लावते मी रक्ताचा’, ‘डोंगरची मैना’, ‘मुरली मल्हारी रायाची’, ‘वारणेचा वाघ’, ‘अशी ही साताऱ्याची तऱ्हा’ आणि ‘फकिरा’ हे गाजलेले चित्रपट निघाले आणि या चित्रपटांना रसिकांनी भरभरून प्रतिसादही दिला.

घरातील अठराविश्व दारिद्र्य आणि लहानपणापासून जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, मुंबईला येण्यासाठी सोसावे लागलेले हाल यातून अण्णाभाऊंचे शरीर बळकट अन् मन प्रगल्भ होत गेले. तमाशात झील ओढताना आलेली स्वरांची समज आणि सिनेमाची पोस्टर्स लावताना बाराखडी, वाचन शिकलेले अण्णाभाऊ लोकशाहीर झाले. दरम्यान, मुंबईत आल्यानंतर घाटकोपरच्या चिरागनगरमध्ये राहत असताना मिळेल ती कामे करत गिरणी कामगार झाले. मात्र गिरणीत काम करताना कामगारांना गुलामाप्रमाणे वागवले जात होते. त्याचा त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला. कम्युनिस्ट नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांची तडाखेबाज भाषणे ऐकून अण्णाभाऊंचे रक्त सळसळत होते. त्यामुळेच  अण्णाभाऊंनी कम्युनिस्टांचा लाल बावटा खांद्यावर घेतला. कामगारांचे दुःख गगनभेदी ललकारीने वेशीवर टांगले. पुढे टिटवाळ्यातील कार्यक्रमात शाहीर अमरशेख, शाहीर दत्ता गव्हाणकर, शाहीर साबळे आणि अण्णाभाऊ साठे यांनी 1944 साली स्थापन केलेल्या लाल बावटा कला पथकाने राजकारण्यांची झोप उडवली.

पोटात न मावणारी भूक आणि अपमानास्पद वागणुकीने अण्णाभाऊंच्या लेखणीला धार आली. त्यांनी लिहिलेल्या कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लोकनाटय़े शोषितांच्या मनाला भिडू लागले. त्यांच्या साहित्यातील पात्रे जणू आपलीच कथा सांगताहेत असे त्यांना वाटू लागले. त्यांच्या साहित्यातील नायक हे गावकुसाबाहेरचे मांग, रामोशी, दरोडेखोर, भटके, आदिवासी असले तरी समाजभान जपणारे निर्भीड होते. त्यांनी चितारलेल्या नायिका विधवा, वेश्या, नाचणाऱ्या, कष्टकरी, भाकरीला परागंदा झालेल्या असल्या तरी प्रचंड स्वाभिनानी, संकटावर मात करणाऱ्या, शिलासाठी  तळहातावर प्राण घेऊन वावरणाऱ्या, प्रामाणिक रामोशी, दरोडेखोरांसोबत संसार थाटणाऱ्या आणि अब्रूला हात घालणाऱ्याच्या टाळक्यात दगड घालणाऱ्या मर्दानी होत्या. या महान प्रतिभावंताने महाराष्ट्राची लोकधारा अटकेपार नेली. त्यातच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णांनी उडी घेतली आणि  बेळगाव, निपाणी आदी 52 गावे संयुक्त महाराष्ट्रात यावीत आणि मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव जनतेपर्यंत न्यावा यासाठी अण्णाभाऊंनी ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची व्हतीया काहिली’ ही अजरामर छक्कड रचली. ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड लोकप्रिय झाली. त्यांच्या ‘अकलेची गोष्ट’ या लोकनाटय़ाला चार-पाचशे बैलगाडय़ांतून माणसे जमत. त्यांची लोकप्रियता डोकेदुखी ठरू लागल्याने राजकारण्यांनी मोठय़ा काव्याने अण्णाभाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तब्बल तीन महिने अमरावतीतील बडनेऱ्याच्या तुरुंगात डांबूनच श्वास घेतला.

1957 साली लिहिलेले ‘देशभक्त घोटाळे’ हे अण्णाभाऊंचे अखेरचे राजकीय लोकनाटय़. या लोकनाटय़ाला ‘जग बदल घालूनि घाव । सांगून गेले मला भीमराव’ या क्रांतिगीताने वेगळी उंची लाभली होती. या गीताची कथा मोठी रंजक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर 1957 च्या एप्रिलमध्ये मुंबईतील कवींनी दादरजवळील नायगावात बाबासाहेबांच्या पहिल्या जयंतीच्या कार्यक्रमात अण्णांनी बाबासाहेबांवरील त्यांची ही पहिली आणि शेवटची कविता सादर केली. हीच कविता देशभक्त घोटाळे लोकनाटय़ात क्रांतिगीत म्हणून वापरली गेली. 1961 मध्ये लिहिलेली ‘फकिरा’ कादंबरी त्यांनी बाबासाहेबांना अर्पण केली. या दोनच बाबी भाऊंना बाबासाहेबांविषयी ओढ असल्याची साक्ष देतात. 18 जुलै 1969 रोजी चिरागनगरच्या त्यांच्या खोलीत निजले ते न उठण्यासाठीच. डोंगराएवढे विविधांगी साहित्य निर्माण करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांनी केवळ मातंग समाजासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी हयात खर्ची घातली. मात्र त्यांचा शेवट सन्मानजनक होऊ शकला नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.