यंगिस्तान – किल्ले मकरंदगड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक

मकरंदगडाच्या माथ्यावरून प्रतापगडाचे, जावळीच्या खोऱ्याचे, कोयनेच्या जलाशयाचे, तळकोकणाचे व मधू शिखराचे सुंदर दर्शन घडते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला.

जावळीचा मुलूख हा घनदाट जंगलाचा व आकाशासोबत स्पर्धा करणाऱया सह्यकडय़ांचा मुलूख. जावळीच्या खोऱयाचे महत्त्व जाणून महाराजांनी हा मुलूख ताब्यात घेताच येथे प्रतापगडसारखा अभेद्य किल्ला बांधून काढला. त्याच वेळी महाराजांची नजर प्रतापगडाच्या पुढय़ात असलेल्या एका वैशिष्टय़पूर्ण डोंगरशृंगावर पडली. किल्ले वासोटा व प्रतापगडादरम्यान असलेल्या या डोंगरशृंगाचे बिनीचे स्थान पाहता महाराजांनी या डोंगरालासुद्धा दुर्गरूप दिले. शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला म्हणजे मकरंदगड होय.

किल्ले मकरंदगडास भेट देण्यासाठी आपणास प्रतापगड जवळचा पार फाटा गाठावा लागतो. चतुर्बेट गावाच्या पुढे उजवीकडे घोणसपूर म्हणजेच मकरंदगडाकडे जाण्यासाठीचा फाटा लागतो. दाट जंगलातून प्रवास करत आपण मकरंदगडाच्या माचीवर असलेल्या घोणसपूर गावात पोहोचतो. गावात प्रवेश करताच समोर पूर्व व पश्चिम अशा दोन शिखरांनी बनलेला मकरंदगड आपले लक्ष वेधून घेतो. यातील पश्चिमेकडील शिखराला ‘मधू’ असे नाव आहे, तर पूर्वेकडील शिखराला ‘मकरंद’ असे संबोधतात.

मकरंदगडाची एक डोंगरसोंड खाली माचीवर उतरली आहे. त्या डोंगरसोंडेने गडाचा कातळ डावीकडे ठेवत वाटचाल केल्यानंतर काही वेळातच आपण गडाच्या भग्न प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो. आजमितीस या ठिकाणी तटबंदीच्या काही खाणाखुणा नावापुरत्याच शिल्लक आहेत. प्रवेशद्वारातून आत आल्यावर पुढे एक शिल्प आहे. येथून दोन वाटा फुटतात. डावीकडील वाट थेट बालेकिल्ल्यावर जाते, तर उजवीकडील वाट गडाच्या पिछाडीस असलेल्या खांबटाक्याकडे जाते. आपण आधी सरळ उजवीकडे जाणाऱया वाटेने खांबटाके गाठायचे.

या खांबटाक्याच्या अलीकडेच बालेकिल्ल्याकडे जाणारी खडी चढण आहे. आपण सावकाश काळजीपूर्वक या वाटेने मकरंदगडाचा माथा गाठायचा. गडावर खासे शिवरायांनी स्थापलेले मल्लिकार्जुन मंदिर आहे.

जावळीचा मुलूख जिंकणे अशक्यप्राय होते. या मुलूखाच्या जोरावरच चंद्रराव मोरे येथे राज्य करत होता. या चंद्रराव मोऱयांनी जावळीच्या मुलूखात सात शिवपुऱयांची व्यवस्था लावून दिली होती. त्यात मकरंदगडाच्या माचीवरील घोणसपुरीचासुद्धा समावेश होता. इसवी सन 1656 च्या सुमारास शिवरायांनी जावळीचा प्रदेश काबीज केला. त्या वेळी मधू-मकरंदगडाभोवतीचे चतुर्बेट हे चंद्रराव मोरेंचे भाऊ हणमंतराव मोऱयांच्या ताब्यात होते. रघुनाथ बल्लाळ व संभाजी कावजी यांनी सोयरिकीच्या निमित्ताने जाऊन हणमंतरावांना ठार मारले व जोर, चतुर्बेट ही ठाणी जिंकून घेतली. जावळीचा पूर्ण ताबा मिळाल्यावर या मुलूखात शिवाजी महाराजांनी प्रतापगडासोबत मकरंदगडसुद्धा बांधला. 14 मे 1818 रोजी प्रतापगडासोबत मकरंदगड इंग्रजांनी जिंकून घेतला.

रूढार्थाने किल्ला म्हटला की, आपल्या डोळय़ांसमोर तटबुरूज, दरवाजे, तोफा येतात, पण आजमितीस यातील कोणतेही अवशेष मकरंदगडावर नाहीत. त्यात या गडाच्या समोर शिवपराक्रमाची दुदुंभी दाही दिशांना वाजविणारा प्रतापगडासारखा मातब्बर किल्ला आहे. त्यामुळे मकरंदगडाकडे सहसा कोणी फिरकत नाही. तरीही महाराजांच्या गडकिल्ल्यांवर नितांत प्रेम करणारे दुर्गप्रेमी शिवनिर्मित मकरंदगडाची पायधूळ आपल्या मस्तकी लावण्यासाठी या गडाला भेट देतातच…