
रत्नागिरी शहरातील माळनाका परिसरातील स्कायवॉकवर उभारण्यात येणारे व्हर्टिकल गार्डन अखेर रदद करण्यात आले आहे.स्कायवॉकवर व्हर्टिकल गार्डन उभारणार असल्याचे वृत्त दैनिक सामनाने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर राजकीय पक्ष आणि नागरीकांकडून स्कायवॉकवरील व्हर्टिकल गार्डनला विरोध झाला. त्यामुळे अखेर स्कायवॉकवरील व्हर्टिकल गार्डन रदद करण्यात आले आहे.
सहा वर्षांपूर्वी माळनाका येथे दोन कोटी रुपये खर्च करून स्कायवॉक उभारण्यात आला होता. माळनाका येथे रहदारीचा रस्ता ओलांडताना त्रास होऊ नये याकरीता स्कायवॉक उभारण्यात आला होता. मात्र नागरीकांनी स्कायवॉककडे पाठ फिरवली. त्यामुळे स्कायवॉकचा अपेक्षेप्रमाणे वापर होत नाही. स्कायवॉककडे नागरीक आकर्षित व्हावेत या उददेशानेच स्कायवॉकवर व्हर्टिकल गार्डन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याकरीता जिल्हा नियोजनमधून 26 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्या कामाची देकार सूचनाही निघाली होती. मात्र दैनिक सामनामधून स्कायवॉकवरील व्हर्टिकल गार्डनचे वृत्त प्रसिद्ध होताच अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ज्या स्कायवॉकचा वापर होत नाही त्या स्कायवॉकवर 26 लाखांचा निधी खर्च करून निधीचा अपव्यय कशाला करायचा असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. नागरीकांचा विरोध लक्षात घेऊन स्कायवॉकवरील व्हर्टिकल गार्डन अखेर रदद करण्यात आले आहे.


























































