कवडसे – वेड लावणारं प्रेम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेंद्र पाटील

असं म्हणतात की, प्रेमात लोक वेडे होतात. मी म्हणायचो प्रेमच वेडं असतं. तू म्हणायचीस, प्रेम करणारी माणसं वेडी असतात. आपल्या दोघांचंही म्हणणं आपापल्या जागी बरोबर होतं.

आता आपलंच उदाहरण घे ना, आपलंही प्रेम वेडंच होतं की. तुझ्या आणि माझ्या स्वभावात जमीन-अस्मानाचा फरक. तू शांत शांत, एकटीच राहणारी, न बोलता खूप काही बोलून जाणारी. मी त्याहून उलट. नेहमी गर्दीत राहणारा, खूप खूप बोलून मोक्याचं सोडून देणारा. तरी तुला मी अन् मला तू आवडू लागलीसच ना? तू डोळय़ांनी बोलायचीस आणि मी शब्दांनी उत्तर द्यायचो, असं आपलं वेडं प्रेम. समोर असलो की, गप्प राहायचं आणि एकमेकांपासून दूर गेल्यावर झुरत बसायचं. एकमेकांच्या आठवणीवर दिवस रेटत राहायचे. मनात येईल तेव्हा वाटेल तिथे आपण भेटत राहायचो. हा वेडेपणा नाही तर काय होतं? प्रेमात असं वेडय़ासारखं वागून मीच त्या प्रेमाला वेडा म्हणायचो. प्रेमाला वेडे म्हणत असताना प्रेमही शांतपणे आपली गंमत पाहत होते. कारण पुढे त्याला कुरघोडी करायची होती.

प्रेम आता आपल्याशी खरोखरच वेडय़ासारखं वागू लागलं होतं. ज्या स्वभावावर फिदा होऊन आपण जवळ आलो होतो, तोच स्वभाव तुला आणि मला अडसर वाटू लागला होता. हा तर प्रेमाचा सर्वात मोठा वेडेपणा होता. पुढे आपल्या भेटीसुद्धा त्याच्या मनाप्रमाणे होऊ लागल्या. केव्हाही, कधीही भेटणारे आपण आता भेटीच्या क्षणांची वाट पाहायचो. भेट होते असे वाटत असताना आपणच ती टाळायचो. खूप जवळ येताना खूप दूर जायचं असं शिकवणारं प्रेम वेडंच ना? त्याचा हा वेडेपणा इथेच थांबला नाही, तर त्याने आपल्याला जितकं अचानक एकत्र आणलं होतं तितकंच अचानक दूरही केलं. आपल्या अशा अचानक दूर जाण्यामुळे आता तुझे प्रेमाविषयीचे मत खरे होण्याची वेळ आली होती. प्रेम करणारी माणसं वेडी असतात. हो, आता मला खरोखरंच वेड लागलं होतं. कारण मी एकटा असलो की, आपल्या प्रेमातले एक-एक वेडे क्षण त्रास द्यायला यायचे. सगळं आठवायचं मला.

तुझा हसरा चेहरा, तुझे बोलके डोळे, तुझा वेडा रुसवा, तुझे वेडे हट्ट, तुझी वेडय़ासारखी वाट पाहणं… त्या वेडय़ा रात्री तुझा विचार करत घालवलेल्या त्या वेडय़ा सांजवेळा तुझ्या-माझ्या भेटीच्या, तुझा वेडा अल्लडपणा, तुझं वेडय़ासारखं माझ्यावर प्रेम करणं या सगळय़ा वेडय़ा आठवणी मलाच वेडय़ा करून गेल्या. प्रेमाने माझं वाक्य खरं करून वेडय़ासारखं वागून दाखवलं आणि नंतर त्याने तुझेही मन राखत प्रेम करणारी माणसे वेडी असतात हे सिद्ध केलं तेही चक्क मलाच वेडं करून. आहे की नाही प्रेम खरोखरच वेडं… आणि प्रेम करणारी माणसंसुद्धा काही तुझ्यासारखी, काही माझ्यासारखी.

[email protected]