संचित- धीरोदत्त टिळक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दिलीप जोशी

लोकमान्यांच्या जीवनात त्यांना व्यापक लोकप्रियता लाभली.  टिळकांच्या गाजलेल्या भाषणांचे ध्वनिमुद्रण दुर्मीळ असले तरी त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतर त्यांनी ज्या बाणेदारपणे उद्गार काढले ते आजही मुंबई हायकोर्टाच्या दालनाच्या भिंतीवर शिलालेखाच्या स्वरूपात नोंदले आहेत.

लोकमान्य टिळकांना जाऊन 103 वर्षे उलटली. मात्र आजही अवघा देश त्यांचे आदराने स्मरण करतो. लोकमान्यांनी काँग्रेसची चळवळ स्वातंत्र्याच्या लढय़ाकडे नेली आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना केली. त्या गर्जनेचे पडसाद देशभर उमटले. अवघा देश थरारून गेला. लखनऊ ते चेन्नई आणि तेव्हाच्या अखंड हिंदुस्थानातील कराची ते कोलकाता अशा टिळकांच्या अनेक ठिकाणी प्रचंड सभा झाल्या. 1900 ते 1908 आणि नंतर 1910 ते 1919 हा काळ लक्षात घेतला तर कोणतीही आधुनिक प्रचार यंत्रणा नसताना देशात सर्वदूर पन्नास-साठ हजारांच्या सभा होणं हीच टिळकांच्या लोकप्रियतेची पावती आहे. व्हॅलेंटाइन चिरोल यांनी लोकमान्यांनी केलेली ही जनजागृती ओळखूनच नंतर त्यांना इंग्रजांच्या दृष्टिकोनातून ‘भारतीय असंतोषाचे जनक’ (फादर ऑफ इंडियन अनरेस्ट) असं म्हटलं. हे नकारात्मक विशेषणच पुढे त्यांचं बिरुद ठरलं.

लोकमान्यांच्या जीवनात त्यांना व्यापक लोकप्रियता लाभली. तशीच काही बाबतीत त्यांच्यावर कठोर टीकाही झाली. त्यावरही भरपूर चर्चा, लखाण झाले आहे. ‘माझ्या दुर्मिळ रेकॉर्ड संग्रहासाठी विविध विचारवंत, नेते यांचे ध्वनिमुद्रण कुठे मिळतं त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा लोकमान्यांची इंग्रजांनी घेतलेली एक फिल्म (1918) असल्याचा उल्लेख आढळला. टिळकांची लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांनी लोकांना आवाहन करून प्लेगच्या साथीत वैद्यकीय यंत्रणांना सहकार्य करावं असा काहीसा त्या छोटय़ा माहितीपटाचा उद्देश होता असं आठवतं. पुण्यात आर्यभूषण थिएटरमध्ये ही फिल्म पाहून लोक आदराने उभे राहिले असंही वर्णन होतं. मात्र तो उल्लेख नेमका कुठला हे आठवत नसल्याने त्या फिल्मचा काही शोध लागला नाही. आता ‘यूटय़ूब’वर टिळकांच्या प्रचंड अंत्ययात्रेवेळची अवघ्या तीस सेकंदांची फिल्म उपलब्ध आहे. काही काळापूर्वी टिळक भास्करबुवा बखले यांच्या गायनापूर्वी श्रोत्यांना काही सांगत असल्याचं ध्वनिमुद्रण आलं होतं, परंतु त्यावरही एकमत नाही.

त्या काळातले प्रसिद्ध नकलाकार आप्पासाहेब भोंडे यांनी टिळकांची केलेली नक्कल अगदी हुबेहूब वठली होती असा टिळकांना पाहिलेल्या लोकांचा अभिप्राय त्यांचे नातू जयंतराव टिळक यांनी नोंदला आहे. त्याच नकलेचे ध्वनिमुद्रणही झालं होतं. ते मला संग्राहक प्रभाकर दातार यांच्याकडून 1978 मध्ये मिळालं. त्याचबरोबर त्यांनी प्रसिद्ध कादंबरीकार प्रा. ना. सी. फडके यांनी लोकमान्यांवर केलेल्या भाषणाची दोन भागांतील ध्वनिमुद्रिकाही ऐकवली होती. त्याचंही रेकार्ंडग माझ्या संग्रही आहे. कदाचित इतर काही ध्वनिमुद्रण, फिल्म अन्यत्र उपलब्ध असेलही.

प्रा. नारायण सीताराम फडके हे मराठीतले एकेकाळचे दिग्गज लेखक. आताच्या पिढीला अभावानेच ठाऊक असलेली फडके, खांडेकर, माडखोलकर ही नावं त्यावेळच्या मराठी वाङ्मयात गाजत होती. फडके यांनी ‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला’ या वादात ‘कलेसाठी कला’ अशी बाजू हिरीरीने मांडली. त्यातून वादविवाद झाला. त्यातला अत्रे-फडके वाद प्रचंड गाजला. मात्र अत्रे यांच्या सत्तराव्या वाढदिवसाला फडके यांनी गौरवपर भाषण करून तो मिटवला, अत्रे यांनीही त्यांच्या खास शैलीत जे उत्तर दिलं त्याचं रेकार्ंडग आहे. फडके यांच्या भाषणाचं रेकार्ंडग ऐकल्याचं आठवतं, पण ते माझ्या संग्रही नाही. तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असलेले फडके संथ लयीत स्पष्ट शब्दोच्चार करत बोलत. माझे वडील त्यांची आठवण सांगत. कारण कोल्हापूरला ते एकाच मार्गावर समोरासमोरच्या इमारतीत राहात होते. माझी आत्या लीला आणि फडके यांची पुढे शिक्षणतज्ञ झालेली कन्याही लीला (पाटील) या वर्गमैत्रिणी होत्या. आत्याही फडक्यांविषयी सांगायची. पद्मभूषण आप्पासाहेब फडके यांना 1970च्या दशकात त्यांच्या ‘दौलत’ बंगल्याच्या झोपाळय़ावर बसलेलं पाहिल्याचं तेवढं आठवतंय.

…तर ‘संगीता’तील ध्वनिमुद्रणात प्रा. फडके यांनी टिळकांना काळय़ा पाण्याची शिक्षा झाली त्यावेळी लोकमान्य कसे धीरोदत्तपणे वागले आणि न्यायाधीश दावर यांना त्यांनी कसे बाणेदार’ उत्तर दिले याचं उत्कट वर्णन केलं आहे. “मला शिक्षा व्हावी ही ईश्वरी इच्छा असावी आणि माझ्या यातनांमुळेच मी घेतलेलं कार्य अधिक यशस्वी होईल असाही संकेत असेल,’’ असे उद्गार टिळकांनी काढताच सारे न्यायालय स्तब्ध झाले. प्रा. फडके यांनी त्याचं प्रभावी वर्णन केलं आहे.

…आज लोकमान्यांचे तेच उद्गार न्यायमूर्ती छगला यांच्यामुळे मुंबई हायकोर्टातील त्या ऐतिहासिक दालनाच्या भिंतीवर शिलालेखाच्या स्वरूपात नोंदले आहेत. ना. सी. फडके यांचं भाषण बहुदा 1947च्या दशकात ध्वनिमुद्रित झालं असावं.

[email protected]