
अधिक मासातील कमला एकादशानिमित्त लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. चंद्रभागास्नान, मुखदर्शन व पदस्पर्श दर्शनरांगेत भाविकांची तोबा गर्दी झाली. दर्शनरांग गोपाळपूर रोडवरील पत्राशेडमध्ये पोहोचली आहे. दर्शनरांगेत लाखाहून अधिक भाविक उभे आहेत. दर्शनासाठी सहा ते आठ तासांचा अवधी लागत आहे. चंद्रभागेला अधिक वाण अर्पण करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
अधिक मासाचा उत्तरार्ध सुरू आहे. यातच कमला एकादशी आल्याने आणि वीकेण्डचा शनिवार असल्याने भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. राज्यभरातून भाविक मोठय़ा संख्येने येत असल्याने त्यांच्या वाहनांनी शहरातील वाहनतळ हाऊसफुल्ल झाले होते. भाविकांमुळे मंदिर परिसर, चंद्रभागा नदी परिसर, दर्शनरांग, प्रदक्षिणामार्ग, भक्तिमार्ग, स्टेशन रोड, गोपाळपूर भाविकांनी फुलून गेले आहेत. नगरपालिकेच्या वतीने विनामूल्य पार्ंकग सेवा देण्यात येत असल्याने बहुतांशी वाहने पार्ंकगमध्ये लावण्यात आली होती.
चंद्रभागेत मुबलक पाणी असल्याने भाविक प्रथमतः चंद्रभागास्नान करण्यास पसंती देत आहेत. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन झाल्यानंतर नगरप्रदक्षिणा करण्यास भाविकांची पसंती आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना अधिकाधिक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दर्शनानंतर भाविक प्रासादिक साहित्यखरेदीसाठी गर्दी करीत होते.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, तरीही कमला एकादशीला लाखो भाविकांनी उपस्थिती लावल्याने पंढरीनगरी गजबजली आहे. दर्शनरांग पत्राशेडच्या पुढे गोपाळपूर रोडवर गेली आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर समितीने पत्राशेडलगत दोन दर्शन शेड उभारले आहेत. दर्शनरांगेत घुसखोरी होऊ नये म्हणून पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
चंद्रभागेला अधिक वाण अर्पण
– चंद्रभागेला अधिक वाण अर्पण करण्यासाठी महिला भाविकांची गर्दी झाली होती. अधिक महिन्यात तांब्याचे भांडे, खण, निरांजन आणि बत्ताशे असा वाण चंद्रभागेला अर्पण करण्यात येतो. कमला एकादशीनिमित्त महिला भाविकांनी अधिक वाण अर्पण करण्यासाठी गर्दी केली होती.
तुळशीपूजा बंद
– जास्तीत जास्त भाविकांना जलद व सुलभ दर्शन मिळावे म्हणून मंदिर समितीने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची पाद्यपूजा व तुळशीपूजा बंद केल्या आहेत. यामुळे दर्शनरांगेतील भाविकांचा वेळ वाचत आहे.
रांगेतील भाविकांना खिचडीचे वाटप
– कमला एकादशी असल्याने मंदिर समितीच्या वतीने भाविकांना खिचडीवाटप केले जात आहे. त्याशिवाय पिण्याचे पाणी आणि चहा दिला जात आहे.

























































