
छत्रपती संभाजीनगर येथून नगर जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या बसचे टायर निखळल्याने मोठा अपघात झाला. राहाता तालुक्यातील निर्मळपिंप्री टोलनाक्याजवळ मध्यरात्री एकच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये चार ते पाच विद्यार्थी जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणून विद्यार्थी आणि शिक्षकांचा जीव वाचला.
तापडीया कोचिंग इन्स्टीट्यूटचे विद्यार्थी आणि शिक्षक नगर जिल्ह्यातील शिर्डी, भंडारदरा येथे पावसाळी पर्यटनासाठी आले होते. पर्यटनाचा आनंद लुटून घरी परतत असताना खासगी बसचे टायर निखळले. बसच्या उजव्या बाजुचे टायर निखळले आणि अनियंत्रित झालेली बस राहाता तालुक्यातील निर्मळप्रिंप्री टोलनाक्याच्या दुभाजकावर आदळली. हा अपघात झाला तेव्हा बसमध्ये 40 विद्यार्थी आणि चार-पाच शिक्षक होते.
अपघातानंतर बसचा दरवाचा लॉक झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षक बसमध्ये अडकून पडले. यादरम्यान बसची काच फुटल्याने काही विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी तिथून बाहेर पडत सुटका करून घेतली. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी घटनास्थळी दाखल होत उर्वरित विद्यार्थ्यांना सुखरूप बसबाहेर काढले.
दरम्यान, लोणी पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पोलीस आणि स्थानिक तरुणांनी पर्यायी बस उपलब्ध करून देत विद्यार्थी आणि शिक्षकांना छत्रपती संभाजीनगरकडे रवाना केले. बसचा अपघात झाला तो टोलनाका बंद पडलेला असून येथे लाईट आणि दुभाजकावर रिफ्लेक्टरही नसल्याने वारंवार अपघात होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.






























































