
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज माजी पंतप्रधान, दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यासाठी दिल्लीत दाखल झाले. त्यांच्या सोबत मंत्रिमंडळातील जेडीयू नेते आणि मंत्री होते. माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एनडीएमधील मित्रपक्ष उपस्थित असतानाच नितीश कुमार अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘सदैव अटल’ स्मारकावर पोहोचले. एनडीए आणि नितीश कुमार एकदम अचानक एकाच वेळी पोहोचल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.
नितीश कुमार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या दोघांची राजधानीत भेट होण्याची शक्यता आहे.
पाटणा येथील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, नितीशकुमार यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
नितीश कुमार, आता I.N.D.I.A आघाडीतील प्रमुख नेत्यांपैकी एक नेते आहेत. ते या महिन्याच्या अखेरीस मुंबईत होणाऱ्या बैठकीपूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतील अशी अपेक्षा आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी होण्याची शकत्या असल्याचं जेडीयूच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितलं असलं तरी त्यांच्या दिल्ली प्रवासाचा तपशील मात्र यात नव्हता.
























































