बेन्ने डोसा आणि कॉफी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगळुरूमध्ये इडली, डोसा उत्तप्पा यांचा अवमान करून पुढे जायचे म्हणजे अय्यो पापच.. बेन्ने डोसा आणि कॉफी. बेन्ने म्हणजे मस्त लोण्याचे गोळे लावून बनवलेला डोसा. तिथल्या डोश्यात बटाटय़ाची पांढरी भाजी न मागता देतात.

या परिसरात जी काही कार्यालये आहेत तिथल्या तरुण मुलांचा सकाळी हाच नाश्ता ठरून गेला आहे. बंगळुरूमध्येच बसावांगुडी नावाचा एक भाग आहे. त्या भागात पिढय़ान्पिढय़ा राहणारी मराठी कुटुंबे आहेत. मराठीच बोलतात, पण मराठीवर दक्षिणी संस्कार झाल्याने त्यांची मराठी पार बदललीय. जेवणही रस्सम, सांबारसह. घरांची नावे मात्र अंबिका स्मृती, देविका भवन, कौस्तुभ अशी आहेत.

याच भागात ब्राह्मण कॅफे नावाचे प्रसिद्ध आऊटलेट आहे. आमची कुठेही शाखा नाही अशा पुणेरी स्टाइलचे बंगळुरूमध्ये एकमेव रेस्टॉरंट. इडली, वडा, खाराभात, केसरीभात, चहा कॉफी एवढे मोजकेच पदार्थ.

पदार्थ संपले की, दुकान बंद. रविवारी बंद. बसायला जागा नाही. बाहेर उभ्याने खायचे. तरी पण रोजची तुंबळ गर्दी. इतके इथले मोजके चार पदार्थ चविष्ट आहेत. यातला खाराभात म्हणजे आपला उपमा आणि केसरभात म्हणजे शिरा. इडली, वडा खाऊन आणि कॉफी पिऊन रसना तृप्त होते.  बंगळुरूमध्ये विद्यार्थी भवन आणि मल्लेश्वरम येथील न्यू कृष्णा भवन, पण इडली-डोसासाठी वाखाणले जाते.

बंगळुरूमधून बाहेर पडून म्हैसूरच्या वाटेला लागले की, महामार्गावर प्रसादम म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तेसुद्धा अफलातून आहे.