तिरंगा झेंड्याच्या जनानखान्यात स्वातंत्र्यलक्ष्मी कुत्र्याचे जिणे जगतेय! भिडे गुरुजींच्या तोंडून गटार बाहेर पडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोक्यावर गांधी टोपी घालून मिरवणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या तोंडून पुन्हा गटार बाहेर पडले. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा जोतिबा फुले आदी महापुरुषांवर यथेच्छ चिखलफेक करूनही समाधान न झाल्याने भिडेंनी तिरंगी झेंड्यालाच जनानखाना ठरवले! 1947 रोजी स्वातंत्र्यलक्ष्मी आली. तेव्हापासून तिरंग्याच्या जनानखान्यात ही स्वातंत्र्यलक्ष्मी कुत्र्याचे जिणे जगत आहे, असे निर्बुद्ध वक्तव्य त्यांनी एका भाषणात केले.

संभाजी भिडे यांच्या भाषणाचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात त्यांनी संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या तिरंगी झेंड्याचा अपमान केला आहे. अकबराच्या जनानखान्यात जीवन जगणारी जोधाबाई आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आलेली स्वातंत्र्यलक्ष्मी यांच्यात काहीही फरक नाही. स्वातंत्र्यलक्ष्मी खांद्यावर तिरंगा घेऊन आली म्हणतात. या तिरंगी झेंड्याच्या जनानखान्यात गेले 75 वर्षे आमची स्वातंत्र्यलक्ष्मी कुत्र्याचे जिणे जगत आहे, असे ते म्हणाले.

संभाजी भिडे यांनी गेल्या महिन्यात महात्मा गांधी यांच्याविषयी अनुदार उद्गार काढले होते. महात्मा गांधी यांचे वडील करमचंद नसून एक मुस्लिम जमीनदार असल्याचा जावईशोध भिडेंनी लावला होता. त्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे देशासाठी काहीही योगदान नसल्याचे अकलेचे तारे त्यांनी तोडले होते. महात्मा फुले यांच्याविषयीही असेच गरळ भिडेंनी ओकले होते.