बी पॉझिटिव्ह – आयुष्यातील दीपस्तंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माझ्या यशस्वी प्रवासाचं श्रेय मी मोहन जोशींना देतो. कधी नैराश्य आलं की, मी सरळ त्यांना जाऊन भेटतो… आयुष्याची सकारात्मक गोष्ट सांगताहेत ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे.

आजही ते दिवस मला लख्ख आठवतात. तेव्हा मेकअप आर्टिस्ट म्हणून मी काम करायचो. माझे वडील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट, त्यांच्याकडूनच मी आणि विक्रम गायकवाड हे मेकअपचे धडे घ्यायचो, पण माझ्या डोळ्यांत मात्र नट व्हायचं स्वप्न होतं. मी बालनाटय़ात काम करायला लागलो होतो. एकांकिका चालूच होत्या. उत्पन्नाचे साधन म्हणून मेकअपचं काम चालू होतं, पण माझ्या मनात मुंबईला कलाक्षेत्रात नाव कमवायचं होतं. प्रयत्नांची शिकस्त करत चाचपडत होतो तेव्हा माझ्या आयुष्यात एक ज्वलंत व्यक्तिमत्त्व आलं. माझं आयुष्य उजळून टाकणारा सूर्य… मोहन जोशी. इतपं विलक्षण सकारात्मक व्यक्तिमत्त्व की, त्यांच्या केवळ असण्यानेच नकारात्मकता दूर दूरपर्यंत उरत नाही. नकारात्मक बोलणं, वागणं तर सोडाच, तसे विचारही त्यांच्या डोक्यात येत नाहीत. ते मला जे म्हणाले ते आजही लक्षात आहे…अशोक, लोक काय म्हणतात त्याकडे लक्ष द्यायचं नाही. ते आपलं घर चालवतात का? नाही ना? मग बिनधास्त स्वतःला झोकून द्यायचं कामात. स्वतःवर विश्वास आहे ना ? काय होईल, नाही जमलं तर मुंबईवरून परत यायचं पुण्याला आणि पुन्हा मेकअप करायचा. त्यात काय एवढं? मग उतारवयामध्ये असं वाटायला नको की, मी हेसुद्धा करून पाहायला हवं होतं. राहून गेलं माझ्याकडून. त्यांच्या या भावनिक पाठिंब्यावर मी मुंबई गाठली, भाडय़ाने घर घेतलं आणि इतकी वर्षे मेहनतीने कलाक्षेत्रात स्वतःचं नाव कमावलं. 170 सिनेमे केले आणि 106 वी मालिका ‘सारे काही तिच्यासाठी’, जी नुकतीच येऊ घातली आहे. या यशस्वी प्रवासाचं श्रेय मी मोहन जोशींना देतो. क़ाम नसेल कधी तर सरळ मी त्यांना जाऊन भेटतो. ते म्हणतात, नाहीये ना काम सध्या ? मग नसू दे की! तीसच्या तीस दिवस काम करायला हवं असं थोडंच आहे ? समोर कितीही मोठा कलाकार असला तरी आपली बॅटिंग तगडी हवी. बॅट आपली आणि बॉलसुद्धा आपलाच. सिक्सर बसलीच पाहिजे प्रत्येक बॉलला!

समीर आठल्ये आणि अलका कुबल यांनी मी मुंबईत नवीन असताना घर घेण्यासाठी मदत केली. प्रचंड भावनिक पाठिंबा दिला. नाना पाटेकर यांनी मला दिलेला संदेश माझ्या लक्षात आहे. नाना म्हणाले, ‘‘अशोक, तुझं काम अतिउत्कृष्ट नाही झालं तरी चालेल, पण लोकांनी तुझ्या कामाची चेष्टा करता कामा नये. तू करणारा प्रत्येक परफॉर्मन्स हा तुझा शेवटचा परफॉर्मन्स आहे असा विचार कर आणि तुझ्यातलं ‘दि बेस्ट’ देत रहा. या शिकवणीचा मला इतका फायदा झाला की, आज सीरियलच्या हजाराव्या एपिसोडमध्येसुद्धा मी पहिल्या एपिसोडमध्ये जी एनर्जी दिली, तीच एनर्जी देतो.

या आणि अशा सगळ्या सकारात्मक शिकवणीमधून मी स्वतःला घडवलं आहे, घडवतो आहे आणि घडवत राहीन. सोबतचे कलाकार नवीन पिढीतले असले तरी मी माझ्या असण्याचा दबाव प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणेदेखील त्यांच्यावर येऊ देत नाही. उलट त्यांना पाठीवर शाबासकीची थाप देऊन उत्तम काम करायला प्रेरित करतो. कारण जर सीन फुलले तरच ती कलाकृती रसिकांना आवडेल आणि निर्माता जगेल आणि निर्माता जगला तर इंडस्ट्री जगेल, युनिट जगेल…इतपं साधंसोपं समीकरण आहे. सकारात्मक विचारसरणीच्या व्यक्तीकडून मला मिळालेलं हे दान आहे, जे मला माणूस म्हणून समृद्ध करून गेलंय.

संकलन-निनाद पाटील