
मुंबई महानगरपालिकेकडून खड्डेमुक्तीचा दावा करून उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रात खड्डय़ांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे पालिकेविरोधात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी खड्डय़ांची रांगोळी, फुले आणि नारळ वाढवून अनोखे आंदोलन केले.
खड्डेमुक्तीसाठी पालिकेकडून कोटय़वधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. खड्डेमुक्तीसाठी नवनवीन तंत्रज्ञान वापरले जात असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रात खड्डय़ांचे साम्राज्य कायम आहे. त्यामुळे शिवसेना अंधेरी विधानसभेकडून हे आंदोलन करण्यात आले. खड्डय़ांमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे. शिवाय अपघातही वाढले आहेत. त्यामुळे पालिकेचा निषेध करीत खड्डय़ांमध्ये रांगोळी व फुले, नारळ वाढवून आंदोलन करण्यात आले. यावेळी विधानसभा संघटक संजय कदम, महिला विभाग संघटक वीणा टॉक, विभागसभा समन्वयक स्वाती घोसाळकर, युवासेना विभाग अधिकारी रमेश वांजळे, उपविभाग संघटक रंजना पाटील, शाखाप्रमुख दीपक सणस, सुधाकर अहिरे व शाखा संघटक पूजा पाटील, प्रीती खारवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.


























































