ईडीच्या कारवाईमुळे काहीजण भाजपसोबत गेले; शरद पवारांकडून अजित पवार गटावर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि भाजपवर हल्ला चढवला. भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. त्यांच्याकडून ईडी, सीबीआय आणि तपासयंत्रणांची भीती दाखवली जात आहे. ईडीच्या कारवाईमुळेच आमच्यातील काहीजण भाजपमध्ये गेले आहेत. ते विकासासाठी गेले असल्याचे सांगतात. मात्र, त्यात काही अर्थ नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

आमच्या काही सहकाऱ्यांनी मार्ग बदलला आणि आज ते भाजपसोबत आहेत. ते सांगताना आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस आहोत, असे सांगतात. विकासासाठी भाजपसोबत गेल्याचे ते सांगतात, पण त्यात काही अर्थ नाही. मात्र, राष्ट्रवादी कोण आहे, हे जनतेला चांगले माहिती आहे. आमची राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका बदललेली नाही. मात्र, काही कारणामुळे काहीजण मार्ग बदलून वेगळ्या वाटेने जात असतील, पर अशा भेकड प्रवृत्तींना जनता मार्ग दाखवेल आणि त्यांना योग्य ठिकाणी पाठवेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. अनिल देशमुख तुरुंगात गेले, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत तुरुंगात गेले. मात्र, त्यांनी भूमिका सोडली नाही, ते भाजपत गेले नाही.

देशात महागाई, बेरोजगारी, शतकऱ्यांच्या समस्या असे अनेक प्रश्न आहेत. राज्यातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्यामुळे राज्यातील तरुणांची रोजगाराची संधी हिरावली गेली आहे. गेल्या 6 महिन्यात राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले. सरकारकडून अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. कांद्यात शुल्कवाढ केल्याने जागतिक बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी बंद झाली. आयात- निर्यातीच्या अयोग्य धोरणामुळे शेतकऱ्यांचा माल पडून राहत आहे.

सत्तेचा गैरवापर सरकारकडून होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वारणसीत महात्मा गांधी यांच्या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठीचे केंद्र होते. ते रिकामे करण्यात आले. तेथील अनेक पुस्तके फेकून देण्यात आली. यातून देश कोणत्या दिशेने जात आहे. याचा विचार करण्याची गरज आहे, असेही शरद पवार म्हणाले. सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढल्या आहेत. सीबीएससी बोर्डाचा अभ्यासक्रम ठरवण्यासाठी संस्था आहे. केंद्र सरकारने या संस्थेला अभ्यासक्रमात बदल करण्याच्या सूचना केल्या. फाळणीच्या वेळी दंगली झाल्या. त्यात अनेकांचा बळी गेला. हा रक्तपाताचा इतिहास होता. आता हा इतिहास पुढील पिढीसमोर जाऊ नये, असा प्रयत्न होता. मात्र, आता या इतिहासात याची माहिती देण्यात येणार आहे. आता फाळणीमध्ये मृत्युमुखी पडलेल्याच्या स्मरणासाठी याचा इतिहासात समावेश करण्यात आला आहे. नवीन पिढी हा रक्तपात विसरत असेल, तर त्यांच्यासमोर हा इतिहास मांडा, अशी विचारसरणी आहे. ही घातक आहे. धार्मिक आणि सामाजिक तेढ यामुळे वाढू शकते.

आम्हाला देशात शांतता हवी आहे. अशा प्रवृत्तींवर हल्ला करण्याची गरज आहे. त्यासाठी जनतेने जागृत राहण्याची गरज आहे. देशात काय होत आहे, त्याकडे आपले लक्ष असले पाहिजे. भाजप आज यंत्रणांचा गैरवापर करत धार्मिक, सामाजिक तेढ पसरवत आहे. ही भूमिका देशाच्या. जनतेच्या आणि राज्याच्या हिताची नाही, ही घातक आहे. त्याविरोधात उभे राहण्याची गरज आहे.

देशातील अनेक पक्ष एकत्र येत आम्ही इंडिया आघाडी स्थापन केली आहे. भाजपशासन नसलेल्या अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि पक्ष या आघाडीत आहेत. या बैठकीत देशातील जनतेच्या संरक्षणासाठी चर्चा करण्यात येणार आहे. जनतेवर हल्ले झाले, खटले भरले गेले तर राष्ट्रवादी तुमच्या पाठिशी खंबीरणे उभी राहील, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला. तसेच देशविघातक प्रवृत्तीविरोधात आता जनतेनेही आवाज उठवण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.