लोकलमध्ये बंगाली बाबांचा सुळसुळाट! ‘एकदा भेटा, हमखास समस्या सोडवणारच’चे डब्यात पोस्टर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्ही नोकरी, धंद्यात अपयशी ठरत आहात का, आर्थिक समस्या आहे का, सुखी संसारात विघ्न येत आहेत का, प्रेमात धोका मिळाला आहे का, अशी कोणतीही समस्या असेल तर एकदा भेटा, कॉल करून पहा, बंगाली बाबा हमखास समस्या सोडवणारच, अशा आशयाच्या पोस्टरचा सध्या लोकल गाडय़ांमध्ये सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे अनेकांची आर्थिक फसवणूक होत असून गाडीचेही विद्रूपीकरण होत आहे, मात्र त्याकडे रेल्वेने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

बुवाबाजी, भोंदूगिरी करणे कायद्याने बंदी आहे, मात्र सर्व समस्यांचा निश्चित निराकरण करणार, वशीकरण स्पेशालिस्ट असे स्वतःला म्हणवून घेणाऱ्या बाबांच्या जाहिरातींनी लोकलमध्ये उच्छाद मांडला असला तरी त्याकडे रेल्वे प्रशासनाबरोबरच आरपीएफकडून दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळेच हे बाबा मोकाट सुटले आहेत. सदरच्या पोस्टरवर संबंधितांचा संपर्क क्रमांक असतो, तरीही रेल्वे का कारवाई करत नाही, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. दरम्यान, याआधी 2014 मध्ये रेल्वेने सदरच्या जाहिराती लावणाऱ्या 377 भोंदूबाबांविरोधात गुन्हा दाखल करत जवळपास तीन लाख रुपयांचा दंड वसूल केला होता, मात्र त्यानंतर रेल्वेने अशा जाहिरातींविरोधात फारशी कारवाई केलेली नाही.