
>> प्रवीण धोपट
स्टॉक मार्केटचा विषय एका व्यक्तीच्या नावाशिवाय पूर्ण होत नाही. ते नाव म्हणजे वॉरन बफेट. 30 ऑगस्ट 1930 साली ओमाहा युनायटेड स्टेट्स येथे जन्मलेल्या या व्यक्तीने स्वतःचे अनोखे तत्त्वज्ञान आणि इन्व्हेस्टमेंटचे रिमार्केबल रेकॉर्ड यामुळे आपले नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे.
वॉरन बफेट यांना लहानपणापासूनच व्यवसायातच रस होता. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी पहिला शेअर खरेदी केला होता. आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोलंबिया बिझनेस स्कूलमधून इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी मास्टर्स डिग्री पूर्ण केली.
वॉरन बफेट यांना केवळ इन्व्हेस्टर म्हणून ओळखले जात नाही, तर त्यांच्या तत्त्वज्ञानानेही जगाला वेड लावले आहे. इन्व्हेस्टमेंटच्या जगात त्यांनी सेट केलेल्या नियमांची आजही पारायणे केली जातात. पहिला नियम म्हणजे, ते अंडरवॅल्यू स्टॉक खरेदी करणे पसंत करतात. बफेट ज्या कंपनीची निवड करतात त्या कंपनीचे फंडामेंटल स्ट्रॉन्ग असते. दुसरा नियम म्हणजे, इन्व्हेस्टमेंट करताना बफेट असा स्टॉक निवडतात ज्या स्टॉकची इंट्रिसिंक व्हॅल्यू कमी असते. त्यामुळे होणारा लॉस कमीतकमी होतो आणि तिसरा नियम म्हणजे, जो स्टॉक ते खरेदी करतात त्याचा कालावधी दीर्घकाळ असतो. ते नेहमी म्हणतात की, ‘‘मी खरेदी केलेल्या शेअर्सचा होल्डिंगचा काळ ‘अमर्याद’ असतो.’’ इंट्राडेच नव्हे तर इंट्रा मिलिसेकंड ट्रेडिंगपर्यत आलेल्या या काळात वॉरन बफेट यांचे हे नियम पुनः पुन्हा अभ्यासण्यासारखे आहेत.
त्यांच्या इन्व्हेस्टमेंटची काही उदाहरणे पाहिली तर त्यांची दूरदृष्टी स्पष्ट होईल. 1965 साली त्यांनी बर्कशीर हाथवे नावाच्या कंपनीत गुंतवणूक केली होती. त्या वेळी ती कंपनी कुठेच नव्हती, पण वॉरन बफेट यांनी गुंतवणूक केल्यानंतर त्या कंपनीने वेगवेगळय़ा इंडस्ट्रीत चांगलीच बाजी मारली. व्यवसाय करणे म्हणजे संपत्ती कमावणे हाच व्यावसायिकाचा हेतू असतो, पण वॉरन बफेट यांनी आपल्या निर्णयाने जगाला चकित केले ते मिलिंडा गेट्स फाऊंडेशनला आपली बहुतांश संपत्ती दान करून. या कृतीने त्यांनी जगापुढे वेगळाच आदर्श ठेवला.
जगात एक नंबरचा गुंतवणूकदार असूनदेखील त्यांनी आपला नम्रपणा ढळू दिलेला नाही. ते आपल्या शेअर होल्डरला दरवर्षी एक पत्र लिहितात. ज्यात अर्थ या विषयाचे तत्त्वज्ञान आणि जगाला परत देण्याच्या भावनेविषयी ते लिहितात. एथिकल बिझनेसचा हट्ट, गुंतवणुकीचे तत्त्वज्ञान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व यामुळे ते कायम स्मरणात राहतात. म्हणूनच आयुष्य, गुंतवणूक आणि अर्थकारणाचा विषय वॉरन बफेट यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही.
(लेखक दीपंकर फिनकॅप इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. येथे गुंतवणूक सल्लागार आहेत)






























































