
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही, अजित पवार हे आमचेच नेते आहेत असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. यानंतर शरद पवार यांनीही आज सकाळी बारामती येथे बोलताना सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्याला दुजोरा दिला होता. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्याला संजय राऊत यांनी स्पष्ट उत्तर देत राष्ट्रवादीत फूट पडल्याचं अगदी मुद्देसूद मांडलं.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे की नाही, हे या राज्याच्या जनतेनं ठरवावं. माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. जशी शिवसेनेत फूटून एक गट वेगळा झाला आणि पक्षाची भूमिका, पक्षप्रमुखांचा विचार बाजूला ठेवून त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली हा पक्षद्रोह आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांची हकालपट्टी केली. ही फूट आहे. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक गट फुटला आणि पक्षाच्या विचारधारेविरुद्ध भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर त्यापक्षानं अजित पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांची हकालपट्टी केली. याला फूट नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? ही फूट आहे, असं संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
या राज्यात राष्ट्रवादीचे दोन अध्यक्ष आहेत एक जयंत पाटील, दुसरे सुनील तटकरे. ही फूट नाही का? अजित पवार गटानं शरद पवार यांची अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आहे हे आपल्याला माहीत असेल. याला आम्ही फूट मानतो. लोकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. लोकांनी ठरवलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. एका गटानं भाजपसोबत ईडीच्या भितीनं हातमिळवणी केली. स्वत: शरद पवार आणि त्यांना माननणारा वैचारिक वर्ग आहे तो मोठा गट महाविकास आघाडीत आहे. आम्ही राज्यात आणि देशात भाजपला पराभूत करायचं ठरवलं आहे. त्यामुळे अजित पवार हे कोणासोबत आहेत हे याचं आम्हाला काही पडलेलं नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण सरळ सरळ दोन गट पडलेले आहेत. आम्ही शरद पवार किंवा जयंत पाटील यांच्याशी चर्चा करतो, अजित पवार यांच्याशी नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. शरद पवार यांचे दोन्ही दगडावर पाय आहेत हे पत्रकाराचं विधान त्यांनी फेटाळून लावलं.
शरद पवार हे कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाहीत. कारण ही त्यांची वैचारिक भूमिका कधीच नव्हती. ज्या विचारधारेतून ते आले आहेत त्यात भाजपचा विचार त्यांना मान्य नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.



























































