नीरज ऑलिम्पिकसाठी पात्र, पहिल्याच प्रयत्नात गोल्डन बॉयचे दुहेरी यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या भालाफेकपटूंनी जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत तिहेरी आनंद मिळवून दिला. ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने आपल्या पहिल्याच फेकीत 88.77 मीटर अंतर गाठत अंतिम फेरी आणि पॅरिस ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले. त्याचबरोबर डीपी मनू आणि किशोर जेना यांनीही अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला. जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपदाच्या इतिहासात एकाच खेळाच्या अंतिम फेरीत तीन हिंदुस्थानी पात्र ठरण्याची ही पहिलीच घटना असून या तिघांनी जोरदार कामगिरी केली तर भालाफेकीत हिंदुस्थान तिन्ही पदकेही जिंकू शकतो.

नीरजच्या कामगिरीमुळे हिंदुस्थानच्या अन्य खेळाडूंनाही स्फूर्ती मिळाली. डीपी मनू आणि किशोर जेनाने जोरदार भालाफेक करत आश्चर्यकारकरीत्या अंतिम फेरीत आपलेही नाव नोंदविले. मनुला पहिल्या प्रयत्नात केवळ 78.10 मीटर भालाफेक करता आली, पण त्याने दुसऱया प्रयत्नांत 81.25 अंतर गाठत अंतिम फेरीसाठी आपला हक्क सांगितला. ‘अ’ गटातून 17 खेळाडू उतरलेले होते, पण केवळ चारच खेळाडूंना 80 मीटरपेक्षा अधिक अंतर गाठता आले. ‘अ’ गटातून पात्र ठरलेल्या चारपैकी दोन खेळाडू हिंदुस्थानचेच होते.

मात्र ‘ब’ गटातील खेळाडूंची कामगिरी आणखी जोरदार होती. या गटातून आठ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. यात हिंदुस्थानच्या किशोर जेनाने पहिल्याच प्रयत्नात 80.55 मीटर फेक केली. मात्र दुसऱया प्रयत्नांत तो 78.07 मीटरच फेक करू शकला आणि त्याचा तिसरा प्रयत्न अपयशी ठरला.

पुन्हा हिंदुस्थान-पाकिस्तान

– भालाफेकपटू नीरज चोप्रानंतर सर्वांचे लक्ष वेधले ते पाकिस्तानच्या अर्शद नदीमने. तो पहिल्या प्रयत्नात 70.53 मीटर तर दुसऱया प्रयत्नांत 81.53 मीटर भालाफेक करू शकला. मात्र त्याने आपल्या तिसऱया प्रयत्नांत 86.79 मीटर अंतर फेक करून अंतिम फेरीसह ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविले. त्याच्या कामगिरीमुळे भालाफेकीत सुवर्ण पदकासाठी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात झुंज लढणार हे निश्चित झाले आहे.

नीरजची मोसमातली सर्वोत्तम कामगिरी

– भालाफेकीत नीरज चोप्राकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात आहे. त्याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना या मोसमातील सर्वोत्तम फेक केली. दुखापतीतून सावरल्यानंतर तो डायमंड लीगमध्ये सुरात दिसला नाही. मात्र आज त्याने विजेत्याच्या थाटात भालाफेक करत जागतिक स्पर्धेत आपलेच नाणे खणखणीत असल्याचे दाखवून दिले. या स्पर्धेत एकूण 34 खेळाडूंनी भालाफेक केली, पण केवळ 12 खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. यात हिंदुस्थानच असा एकमेव देश आहे त्याचे तीन खेळाडू अंतिम फेरीत खेळणार आहेत.

ऑलिम्पिक पात्रतेसाठी 85 मीटर भालाफेक

– ऑलिम्पिक पात्रतेसाठी 85.50 मीटर भालाफेक गरजेची होती आणि हिंदुस्थानच्या ऑलिम्पिक सुवर्ण विजेत्या नीरज चोप्राने आपल्या पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर जबरदस्त अंतर गाठत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलीच. सोबत पॅरिस ऑलिम्पिकमध्येही आपले स्थान निश्चित केले.