
>> महेंद्र पाटील
मनाला नेहमीच छान छान सुचतंच असं नाही. कधी बोलक्या मनातले शब्द हसवतात, कधी अबोल होतात. परवा संध्याकाळी सहज काहीतरी लिहीत असताना शब्दच सुचेनासे झाले. नेहमी सहजपणे कुणाच्याही मनाचा थांग घेऊन त्या मनाचं चित्र रेखाटून काढावं तसं मी लिहायचो. एकेक भावना, एकेक शब्द, मनाच्या अवस्था, मनाच्या लहरी, मनाची चंचलता, मनात हुरहुर माजवणारं काहूर, जपलेले क्षण, काही आठवणी, काही वेदना, एखादी सल, एखादं दुःख… मनाच्या अंतरंगातल्या अशा प्रत्येक गोष्टीवर काहीना काही लिहीत जायचो, पण आज काहीच सुचत नव्हतं माझ्या मनाला.
इतक्यात एक सुंदर मन माझ्या समोर आलं. मनानं ठरवलं, चला, आज या सुंदर मनालाच विचारावं आणि सुरुवात करावी, पण जेव्हा माझ्या मनाने प्रश्न विचारला तेव्हा “मी काय देऊ तुला उत्तर?” त्या मनाने सांगितलं. कधी कधी शब्दांवर विराजमान होऊन शब्दांशी लीलया खेळणारं मनसुद्धा अबोल होतं हे त्या मनाला ठाऊक नव्हतं. सुरुवातीला त्या मनाला वाटलं, माझं मन त्याची परीक्षा घेतंय की काय? पण जेव्हा त्याला जाणीव झाली, खरोखरच या मनाला आता माझ्या मनातल्या शब्दाची ओढ लागली आहे तेव्हा ते बावरलं, पण तरीही प्रयत्न करू लागलं, काहीतरी सुचतंय का याचा. स्वतच्या मनातले कोपरे शोधू लागलं, पण का कुणास ठाऊक, त्या मनालाही काहीच सुचत नव्हतं आज. कारण आपल्याच मनाचा थांग कसा घ्यावा हे कळत नव्हतं त्याला. मनाची घालमेल, कोंडमारा, मनाची चंचलता… काय आणि कसं सांगावं, कसं शब्दांत बांधावं हे बहुधा ठाऊक नसावं त्या मनाला.
संध्याकाळ झाली आणि ते मन दूर प्रवासाला निघालं होतं. आभाळ पश्चिमेला झुकू लागलं होतं. मंद वारा वाहत होता. तिच्या मनात खूप विचारांनी गर्दी केली होती. माझ्या प्रत्येक प्रश्नाला तिचं गोड मन उत्तर देऊ लागलं, पण मला हवी असणारी शब्दांची शिदोरी मात्र त्या मनाला काही देता येत नव्हती. माझं मनही त्या मनाची पाठ सोडायला तयार नव्हतं. तिचं मन बावरलेलं, तिचं मन चंचल. सर्व काही वाटू लागलं त्या मनाला आणि खूप सारे प्रश्न पडू लागले. मन असं का असतं? मन का घाबरतं, का बावरतं, का हुरहुरतं? माझ्या मनासारखं प्रत्येकाचं मन असतं का? असे प्रश्न आता ती मलाच विचारू लागली होती. मी मुद्दाम म्हटलं, कधीतरी तुझ्या मनाला तुझ्यातून बाहेर काढून तुलाच दाखवेन कसं आणि काय आहे ते. तेव्हा ती मनातल्या मनात गोड हसली. तिचा प्रवास सुरू होता. जसे माझे प्रश्न सुरू होते तशी तिची उत्तरं.
संध्याकाळ आणखीच गडद झाली होती. हवेत गारवा पसरलेला, हिरव्यागर्द झाडांच्या रस्त्यातून तिचं मन प्रवास करत होतं. हळूच माझं मन तिच्या मनाभोवती जाऊन बसलं आणि तिच्या मनाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागलं. तिला जेव्हा हे कळलं तेव्हा माझ्या मनाला ‘वेडं’ म्हणाली ती. मनही म्हणालं, वेडी माणसंच नेहमी इतिहास घडवतात. विषय सुचत नव्हता तरी माझ्या मनाच्या तिच्या मनाशी चाललेल्या गप्पांमुळे तिचा प्रवास सुखकर झाला. हळूहळू माझं मन तिच्या मनातले शब्द वेचण्याचा प्रयत्न करू लागलं. तेव्हा जाणीव झाली, चार दिवसांपूर्वीच असंच बोलता बोलता माझ्या मनातले काही शब्द तिच्या मनात लपून बसले होते. ते एकेक करून मला दिसू लागले आणि माझे हरवलेले शब्द वेचून पुन्हा मी काहीतरी लिहू लागलो. तिचाही प्रवास संपत आला होता. तिला ज्या वळणावर थांबायचं होतं तिथे ती थांबली आणि माझे शब्द एकेक करत कागदावर उतरू लागले. सुरुवातीला सुनं सुनं असणारं माझं मन तिच्या मनाशी एकरूप होऊन बोलू लागलं तेव्हा तिचं सुनं मनसुद्धा अबोलपणे खूप काही सांगून गेलं.
सुन्या सुन्या संध्याकाळी एक सुनं मन दुसऱया सुन्या मनाशी भावना व्यक्त करत एक नवं नातं जन्माला घातलं आणि एक नवी हुरहुर मनात सोडून गेली एक सुनी संध्याकाळ!





























































