…म्हणून मी मंदिरांमध्ये जातो, धर्मग्रंथ वाचतो; ‘इस्त्रो’च्या प्रमुखांनी केलं स्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची मिशन चंद्र मोहीम यशस्वी झाली असून बुधवारी 23 ऑगस्ट रोजी ‘चांद्रयान-3’चे (Chandrayaan-3) विक्रम लँडर दक्षिण ध्रुवावर उतरले. दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा हिंदुस्थान पहिला देश ठरला आहे. ही मोहीन यशस्वी होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) विदेशातून येताच बंगळुरू येथील इस्त्रोच्या कमांड सेंटरला भेट देऊन शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. त्यानंतर रविवारी ‘इस्त्रो’चे प्रमुख एस. सोमनाथ (S Somanath) यांनी केरळमधील तिरुवनंतपुरम (Thiruvananthapuram) येथे भद्रकाली देवीचे दर्शन घेतले. येथे पुजा-अर्चा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि आपण मंदिरात का जातो याचेही उत्तर दिले.

मी एक वैज्ञानिक असून शोध घेणे हे माझे काम आहे. मी चंद्राबाबत शोध घेत आहे. त्याचप्रमाणे अध्यात्माचाही शोध घेत आहे. विज्ञान आणि अध्यात्माचा शोध घेणे माझ्या आयुष्यातील प्रवासाचा भाग आहे. दोन्हीकडे नवनव्या गोष्टींचा शोध घेणे मला आवडते. यासाठी मी अनेक मंदिरात जातो, अनेक धर्मग्रंथ वाचतो आणि या विश्वातील आपले अस्तित्व जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, असे एस. सोमनाथ म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आपल्या ब्रह्मांडाचा शोध घेणे जसे महत्त्वाचे आहे तसेच आपल्या अस्तित्वाचा शोधही आवश्यक आहे. मंदिरं ही आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहेत. ब्रह्मांडात काय दडले आहे याचासाठी शास्त्रीय प्रयोग आवश्यक आहे, तर आत्म्याला शांतता लाभावी म्हणून मंदिरात जाणेही आवश्यक आहे.

दरम्यान, विक्रम लँडर उतरले त्या ठिकाणाला ‘शिव-शक्ती’ पॉइंट नाव देण्यात आले आहे. या नावाला अनेकांनी विरोध केला. यावरही एस. सोमनाथ यांनी भाष्य केले. ‘शिव-शक्ती’ आणि ‘तिरंगा’ ही दोन्ही हिंदुस्थानी नावं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचा अर्थही सांगितला आहे. या नावात काही गैर नसल्याचे एस. सोमनाथ म्हणाले.

एस. सोमनाथ यांनी यावेळी आपल्याकडे चंद्र, मंगळ आणि शुक्र ग्रहावर जाण्याची क्षमता असल्याचे म्हटले. यासाठी आत्मविश्वास वाढवण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. अंतराळ क्षेत्रामध्ये आपल्याला अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. हे क्षेत्र वाढले पाहिजे. यातून देशाचा विकास व्हावा हे आमचे ध्येय असल्याचेही ते म्हणाले.