दादांची दादांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; निधीअभावी विकासकामं लटकल्यानं पुण्यात चंद्रकांत पाटलांची पंचाईत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ajit pawar chandrakant patil

मिंधे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेला अजित पवार गट सत्तेत आला तेव्हा भाजपच्या मंत्र्यांनी त्यांच जोरदार समर्थन केलं होतं. मात्र आतमध्ये खदखद होती. आता ती खदखद बाहेर पडू लागल्याचं चित्र आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे ‘सुपर पालकमंत्री’ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आधीच अजित पवार यांनी बैठकांचा धडाका लावला आहे आणि आता पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांची निधीवरून कोल्ड वॉर रंगल्याच्या चर्चा आहे. तब्बल 400 कोटी रुपयांच्या विकासकामांना निधीच मिळाला नसल्याची तक्रार खुद्द चंद्रकांत पाटील यांनी केल्याचं कळतं आहे. त्यांनी निधीसंदर्भातील ही तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचं बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात तीन महिन्यांपूर्वी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीत 400 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली होती. असं असताना देखील तीन महिन्यांनंतरही अर्थखात्यानं त्याला अद्याप मंजुरी दिलेली नाही. अजित पवार राज्याच्या सत्तेत सहभागी होण्यापूर्वी जिल्हा नियोजन समितीची ही बैठक झाली होती. अर्थखात्याच्या या कारभारावर चंद्रकांत पाटील यांनी नारजी व्यक्त केल्याचं आणि थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे महायुतीत सारंकाही आलबेल असल्याचं चित्र खोटं असल्याचंही दिसत आहे.