
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी निवडून आल्याने तक्रारदारांपैकी कोणाचेही वैयक्तिक नुकसान झाले नसल्याचे म्हणणे खासदारांच्या वकिलांनी जातवैधता समितीपुढे मांडले. पण एखाद्या संशयास्पद प्रकरणात जातपडताळणी अधिनियमानुसार समितीला स्वतःहून चौकशीचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यासंबंधीचा नवा आदेश पडताळणी समिती दोन दिवसांत काढणार आहे.
खासदार डॉ. महास्वामी यांनी निवडणुकीवेळी बनावट जातवैधता प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांच्यासह अन्य दोघांनी जातपडताळणी समितीकडे केली होती. समितीने कागदपत्रांची पडताळणी आणि दक्षता पथकाद्वारे चौकशी करून खासदारांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल दिला होता. या प्रकरणात खासदारांविरुद्ध कलम 420अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे; पण उच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्यांना आता म्हणणे मांडण्यासाठी पुरेसा केळ देऊन त्याचा स्वतंत्र अहकाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार पुन्हा या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. आतापर्यंत तीन सुनावणी झाल्या असून, सोमवारी खासदारांच्या सात वकिलांनी त्यांची बाजू मांडली; पण यापूर्वी खासदारांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल समितीने दिल्याने या प्रकरणात आता तक्रारदार असले किंवा नसले, तरीही समिती स्वतःहून हे प्रकरण पुढे चालविणार आहे.























































