मराठा समाजाने थोडा संयम राखण्याची गरज! मुख्यमंत्र्यांचा सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. मराठा समाला आरक्षण मिळावं यासाठी समाजबांधव उपोषणासाठी बसले आहेत. अशात काही दिवसांपूर्वी जालन्यात लाठीचार्ज झाल्यानंतर राज्यात प्रचंड संताप निर्माण झाला. अखेर राज्य सरकारनं आज तातडीनं एक बैठक बोलवली. यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला संयम राखण्याचा सल्ला दिला.

आज उच्चस्तरीय बैठक पार पडल्यानंतर आपण स्वत: उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलल्याची माहिती शिंदे यांनी दिली. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, त्यांच्या आंदोलनावर सरकार काम करत आहे. मराठा समाज मागास नाही, हे सर्वोच्च न्यायायलयानं म्हटलं आहे. मराठा समाज मागास आहे, या बाबी न्यायालयासमोर आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आम्ही मराठा समाजाच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

‘याआधी अधिसंख्यापदावर 3700 तरुणांना आम्ही नोकरीत सामावून घेतला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेकांना कर्ज दिलं. त्याचं व्याज सरकार भरत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते टिकलं पाहिजे. आमची आधीपासून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आहे. मात्र त्यासाठी मराठा समाजानं थोडा संयम राखण्याची गरज असल्याचं शिंदे यांनी आवाहन केलं.

मराठा समाजानं सावध राहिलं पाहिजे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. आम्हाला या मुद्द्याचं राजकारण करायचं नाही, असंही ते म्हणाले. लाठीचार्जची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र आरक्षणासाठी सरकारनं कोणतं ठोस पाऊल उचललं आहे याची माहिती या पत्रकार परिषदेतून मिळाली नसल्याचं म्हटलं जात आहे.