
मुख्य रस्त्यांतील चौकांमध्ये उभ्या केल्या जाणाऱ्या महापुरुषांच्या पुतळ्यांबाबत उच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली. सार्वजनिक ठिकाणी उभारलेले महापुरुषांचे पुतळे हे नागरिकांसाठी निश्चितच प्रेरणास्थान असतात. मात्र पुतळ्यांचा रस्ते वाहतुकीला अडथळा ठरणार नाही याची खबरदारी घेणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केले. कोथरूड येथील महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याला विरोध करणारी रिट याचिका सुनावणीला आली. त्या याचिकेची गंभीर दखल घेताना न्यायालयाने पुणे महापालिकेला प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
कोथरूडच्या बस स्टँडजवळील मुख्य चौकात पुणे महापालिकेने भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. हा पुतळा ज्या जागेत उभारण्यात आला आहे, ती जागा रस्ता रुंदीकरणासाठी संपादित करण्यात आली होती. मात्र पालिकेने दुसऱया ठिकाणाहून महर्षी कर्वेंचा पुतळा आणून तो या जागेवर स्थानापन्न केला आहे, असा आक्षेप घेत इंदुमती बोरसे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्या बोरसे यांच्यावतीने अॅड. चंदना सालगावकर यांनी, तर पुणे पालिकेतर्फे अॅड. अभिजीत कुलकर्णी यांनी बाजू मांडली.
होर्डिंग्जला परवानगी मिळवण्याचा घाट
याचिकाकर्त्यांनी महर्षी कर्वेंच्या पुतळ्याच्या मागील भागात होर्डिंग्ज उभारले आहे. त्यावर आक्षेपार्ह जाहिरातबाजी करण्यास मनाई करीत पालिकेने कारवाई केली. त्याच पार्श्वभूमीवर याचिका करून महर्षी कर्वेंच्या पुतळ्याला विरोध केला जात आहे. या माध्यमातून होर्डिंग्जला परवानगी मिळवण्याचा याचिकाकर्त्यांचा घाट आहे, असा दावा पालिकेने केला.
न्यायालय म्हणाले…
सार्वजनिक ठिकाणी उभारलेले महापुरुषांचे पुतळे हे रस्त्यावरून ये-जा करणाऱया नागरिकांसाठी निश्चितच प्रेरणास्थान असतात.
पुतळे पाहून लोकांना त्या महापुरुषांच्या कार्याचे स्मरण होते. हे कुणी नाकारु शकत नाही. पुतळे उभारण्यावर न्यायालयही कुठली हरकत घेत नाही. यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने यासंदर्भात स्पष्ट मते नोंदवली आहेत.
मुख्य रस्त्यांवरील चौकांमध्ये ज्यावेळी महापुरुषांचे पुतळे उभारले जातात, त्यावेळी त्या पुतळ्यांचा रस्ते वाहतुकीत अडथळा येणार नाही, याचीही खबरदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
























































