मराठा समाज आरक्षण नेवासामध्ये निषेध मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटा येथे मराठा आक्रोश मोर्चावर झालेल्या निर्दयी गोळीबार लाठी हल्ला करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी, मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नेवासा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढून गणपती चौक येथे रस्ता रोको आंदोलन केले.

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे ,लाठी हल्ल्याची चौकशी करावी इत्यादी मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे यांनी स्वीकारले. दरम्यान राम गायकवाड यांनी आरक्षणासाठी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी गायकवाड यांना ताब्यात घेतले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी एकत्र आलो असून प्रसंगी आरक्षण हिसकावून घेऊ मात्र आता माघार घेणार नाही, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, जय शिवाजी, जय भवानी या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

एका रात्रीत नोटबंदीचा निर्णय करणारे सरकार मराठा आरक्षणासाठी अध्यादेश का काढत नाहीत असा सवाल यावेळी एका वक्त्याने केला. यावेळी स्नेहल दरंदले ,पुनम दरंदले, ऋतुजा रौंदळ ,राणी दरंदले ,ऋतुजा कोकणे ,श्रावणी कर्डिले या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करून सरकारचे वाभाडे काढले. निषेध मोर्चाला सर्व धर्मीय सर्व पक्षांनी पाठिंबा दिला. नेवासा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी तरुणांनी भगव्या टोप्या घालून, भगवे ध्वज हातात घेऊन सहभाग नोंदवल्याने एक प्रकारे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी भगवे वादळ अवतरल्याचे चित्र नेवासा येथे पहावयास मिळाले.