
मुंबईकर, पर्यटकांची पसंती असलेली ओपन डेक बसेस इतिहासजमा होणार अशा बातम्या झळकताच बेस्ट उपक्रमाने नवीन ओपन डेक बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बुधवारी बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले. बेस्ट उपक्रमामार्फत ‘मुंबई दर्शन’ या सेवेसाठी ‘ओपन डेक’ बसगाडय़ा प्रवर्तित करण्यात येत आहेत. परंतु बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये सध्या असलेल्या 3 ‘ओपन डेक’ बसगाडय़ांचे आयुर्मान पंधरा वर्षे पूर्ण होत असल्याने शासन निर्णयाप्रमाणे या गाडय़ा 5 ऑक्टोबर 2023 रोजी मोडीत काढण्यात येणार आहेत. मुंबईच्या जनतेचा आणि पर्यटकांचा ओपन डेक बसगाडय़ांबाबतचे प्रेम आणि त्यांना या बसगाडय़ांतून मिळणारा वेगळा अनुभव, ‘मुंबई दर्शन’ बस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद विचारात घेता बेस्ट उपक्रमातर्फे नवीन दुमजली ‘ओपन डेक’ बसगाडय़ा खरेदी करण्याची प्रक्रियादेखील सुरू केल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.





























































