
>> संजय मोने
वाद घालणे व उकरून काढणे आणि त्यासाठी वेळेला ते निर्माण करणे अशी पिढीजात वाद घालण्याची परंपरा लाभलेला देवांकुर कमलअंकुर विचारे. विचित्र नावाची ही परंपराही पिढीजातच. असा विचित्रपणा लाभलेल्या घरातील देवांकुर तसा साधा. शिक्षण घेऊन परदेशात स्थायिक होताना त्याने निवडलेला व्यवसाय या विचित्रपणाच्या अगदी विरुद्ध असाच म्हणायला हवा.
नाव विचित्र होतं त्याचं. वागणं, बोलणं त्याहून विक्षिप्त. नाव देवांकुर कमलअंकुर विचारे. आईचं नाव कमलकांताकुमारी. वडिलांचं नाव कमलअंकुर रामकांती विचारे. त्याच्या आजोबांचं त्याहून विचित्र रामकांती किवाडेश्वर विचारे. त्याच्या पणजोबांचे नाव माहीत नाही, पण तसलंच काहीतरी असणार. समस्त कुटुंब अत्यंत आगळंच वागणारं. आजोबा घरातून कोथिंबीर आणायला एकदा निघाले. आजीनं विचारलं,
“कधी येणार?”
“मनासारखी कोथिंबीर मिळाली की तत्काळ.”
16 दिवसांनी आजोबा परत आले. हातात पोतं भरून कोथिंबीर होती.
“कुठे गेला होतात?” आजीनं विचारलं.
“हिमाचल प्रदेश. फार सुंदर कोथिंबीर मिळाली. बघ, बघ.”
आजूबाजूचे शेजारी चिंतेत होते. माणूस गेला कुठे? आजी निश्चिंत होती.
“येतील हो, काय घाई आहे. मनासारखी वस्तू मिळाल्याशिवाय परत येणार नाहीत.”
शेजारी वेडे होऊन परत निघत होते.
“बघा, सगळे तुमची काळजी करत होते. गेले कुठे? फोन नाही काही नाही.”
“कसली काळजी, मी नाही, तर माझी बॉडी तरी येईलच की!” आजोबा.
“तेच मी सांगत होते. मागच्या वेळी ताजा ढोकळा आणायला म्हणून सुरतला गेला होतात ना?” बर्फाहून थंड स्वरात आजी म्हणाली.
“अहो आजी, सुरतहून ढोकळा इथे येईपर्यंत तो ताजा कसा राहील?” एक नव्याने अक्कल आलेला तरुण शेजारी प्रश्न विचारता झाला.
“एवढी बुद्धी आहे यांना. ढोकळा बनवणारा कारागीरच आणला होता त्यांनी. घरात तयार करून सगळय़ांना वाटला होता यांनी. तू लहान होतास तेव्हा फार अक्कल नव्हती तुला, आता आहे असेही नाही.” त्या तरुणाचा आणि उरलेल्या शेजाऱयांचा एका वाक्यात तुकडा तोडून आजींनी दरवाजा लावून घेतला. अशा घरात जन्माला आल्यानंतर पुढे काय होणार? आजोबा वकील होते. त्यांची कचेरी घरातच होती.
अशील घरात आलं की आजोबांची आज्ञा स्वयंपाकघरात जायची, “चहा आणा, साखर भरपूर घाला. हे पैसे देणार आहेत.”
आजोबांच्या हाताला किंवा जिभेला यश होतं. सहसा ते कधी खटला हरले नाहीत. अशीलाकडून पैसे घेताना ते त्यालाच मोजायला लावायचे.
“गणित चांगलं आहे माझं आणि नजर त्याहून उत्तम आहे. मोजताना चुकू नका.”
पैसे हातात आले की, ते हातात धरून तोलून बघायचे.
“एक नोट जास्त आल्ये. ही घ्या.”
“नाही हो. बरोबर मोजल्यात.”
“पुन्हा मोजा. वाणी होते माझे पूर्वज. वजनात दांडी मारून कमी माल द्यायचे. मला ते पटायचं नाही. म्हणून मी तागडी बदलून घेतली. मोजा.”
…आणि खरंच एखादी नोट कमी किंवा जास्त असायची.
“धन्यवाद.”
“खिशात नका घालू. नकळत आल्ये ना? हा घ्या फॉर्म, या संस्थेला त्या पैशाची देणगी द्या. आदिवासी शिक्षण केंद्र आहे. पोरं शिकतील.”
त्या माणसाने फॉर्म भरायला घेतला की, त्यात तितकेच पैसे स्वतच्या खिशातून काढून द्यायचे.
“हे घ्या पैसे, पण नाव तुमचंच घाला. कोर्टात घालवायला पैसे आहेत तुमच्याकडे? जरा दानधर्म करा. वर जाताना तुमच्या नावावर जरा पुण्य लागेल.”
अशील गार होऊन वेडय़ासारखा निघून जायचा. शिवाय या सगळय़ा लोकांची एक सामायिक सवय होती, वाद घालणे व उकरून काढणे आणि त्यासाठी वेळेला ते निर्माण करणे. त्या मानाने देवांकुर फारच साधा होता. वाद मिटवण्याकडे त्याचा सहसा कल असायचा. अर्थात त्याला ते काम भरपूर वेळा करावं लागायचं. सतत वडील नाहीतर आजोबा आपल्या घराच्या दारात उभे राहून तारस्वरात चर्चा करायचे किंवा हेच सगळं कोणाच्या तरी दरवाजासमोर घडायचं. एकदा तो आजोबांबरोबर गावाला किंवा कुठेतरी चालला होता. जाताना आजीने हातावर दही ठेवलं. आई बिचारी चिंतातुर चेहऱयाने दाराच्या आत उभी होती. मनोमन प्रवास सुखरूप म्हणजे बिनभांडणाचा होऊ दे म्हणून प्रार्थना करत होती.
“जाताना कुठे भांडत बसू नका आणि वेळ आलीच तर आपलं म्हणणं खरं होईपर्यंत थांबू नका.” आजीने या भाषेत दह्याबरोबर मंत्र दिला. सुदैवाने भांडणाचा प्रसंग आला नाही. देवांकुर फारच हुशार होता. चटचट उत्तम गुण मिळवून तो खूप शिकला. साहजिकच त्याला परदेशात नोकरी मिळाली. तिथे जाण्याआधी सत्यनारायण घालावा असं सगळय़ांचं मत पडलं. कुठलीही चर्चा किंवा वाद न होता झालेला तो त्यांच्या घरातला पहिला निर्णय होता.
पूजेचं सामान आणायला देवांकुरची आई गेली. त्यामुळे भावावर घासाघीस न होता सगळं पार पडलं. नाही म्हणायला जिलब्या की बासुंदी, यावर किंचित मतभेद होऊन जेवणाचा बेतही ठरला. त्या दिवशी सकाळी भटजी आले. पूजा सुरू झाली. मुहूर्त वगैरे असल्याने भटजी जरा घाई करत होते. समोर पूजेचे पुस्तक घेऊन आजोबा उभे होते.
“भटजी, उगाच मधले मंत्र गाळू नका. पैसे कापीन तुमचे.”
“सगळे महत्त्वाचे मंत्र म्हटले आहेत. उगाच माझ्या कामात हस्तक्षेप करू नका.” भटजींनीही आवाज वाढवला.
आजोबांनी हाताला धरून भटजींना उठवलं आणि बाहेरचा रस्ता दाखवला. देवांकुर स्वत पूजा वाचायला बसला. दोन-तीन दिवसांनंतर…
“देवांकुर, तिथला सगळा खर्च वगैरे कसं काय करणार?” वडिलांनी विचारलं.
“करेन काहीतरी नोकरी पार्ट-टाइम.”
“नको. तिथे आपली मंडळी भरपूर आहेत आणि कार्याचे भटजी फार कमी असणार. तेव्हा तू हे शिकून घे. मागशील तेवढे पैसे मिळतील आणि शिवाय कोणाची चाकरी करायला नको.” वडिलांनी निर्णय दिला.
पुढे परदेशात जाईपर्यंत देवांकुर सगळं शिकला. परदेशात गेल्यावर त्याला बक्कळ काम मिळालं. शिवाय भोजनाचा खर्चही वाचला. हळूहळू त्याला तारखांची नोंद करण्यासाठी वेगळी वही ठेवावी लागली. दोन-पाच वर्षांत त्याने स्वतची गाडी घेतली. एरवीही तो सहज घेऊ शकला असता इतका पगार त्याला मिळत होता, पण ही त्याने पूजा आणि इतर कार्यांच्या पैशांतून घेतली होती.
आता त्याने नोकरी सोडली आहे. त्याची स्वतची वेबसाइट आहे. त्यामार्फत त्याला आगाऊ सांगून बोलवावे लागते. त्याचं स्वतचं घर आहे. त्याच्या बाहेरच्या खोलीत त्याची कचेरी आहे. महिन्यातील सुमारे 15 दिवस तो काम करतो आणि उरलेल्या दिवसांत तिथल्या ज्या मुलांना या कार्यात रस आहे त्यांना संथा देतो. त्याचे वेगळे क्लासेस आहेत. दाबून उत्पन्न आहे. प्रत्येक पैशाचा अधिकृत हिशेब ठेवून तो कर भरतो. तिथल्या लोकांच्या ओळखीमुळे त्याला नागरिकत्व मिळालं आहे. मी त्याला आधीपासून ओळखत नव्हतो. कामासाठी त्या देशात गेलो असताना सहज फिरता फिरता एक पगडी घातलेला इसम मला दिसला. कुतूहल म्हणून मी विचारपूस केली. त्याने त्याचा पत्ता मला दिला आणि गप्पा मारायला बोलावलं. त्या गप्पांच्या दरम्यान त्याने त्याचा सगळा प्रवास मला सांगितला तोच मी तुमच्यासमोर मांडला आहे. परत निघालो तेव्हा तो एकच वाक्य म्हणाला,
“बाकी उत्तम चाललंय, पण पिढीजात वाद घालण्याची परंपरा मी सांभाळू शकलो नाही.”
असा हा ब्रिटिश भटजी!























































