
तलाठी परीक्षेचा पेपर फुटल्याने तलाठी पदाची ऑनलाईन परीक्षा संशयाच्या भोवर्यात अडकली आहे. पेपर फुटी प्रकरणी परीक्षा घेणार्या टिस्कॉन कंपनीच्या कर्मचार्यांचा समावेश असल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एमआयडीसी सिडको पोलिसांनी पेपर फुटीचे धागेदोरे जुळवत दोन पर्यवेक्षकांसह एका सफाई कामगार महिलेसही अटक केली. या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून यात मोठे मासे देखील गळाला लागण्याची शक्यता पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी पत्रकार परिषदेत वर्तवली.
एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांच्या पथकाने तलाठी पेपर फुटीप्रकरणी हर्मन कंपनीसमोरील रोडवरून काद्राबादमधील राजू भीमराव नागरे (29) याला अटक करून त्याच्या ताब्यातून मास्टर कार्ड, दोन मोबाईल जप्त केले होते. पोलिसांनी मोबाईल चेक केले असता त्यांना धक्काच बसला. मोबाईलच्या टेलिग्रॅम अॅपवर 5 सप्टेंबरच्या तलाठी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमधील 34 प्रश्नांचे फोटो आढळून आले. पेपर फुटी रॅकेटमध्ये विजय पाटीलसह दोन जण साथीदार असल्याची कबुली दिली.
पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांच्या पथकाने तलाठी परीक्षेचा पेपर फुटीच्या तपासाला सुरुवात करत या सेंटरचा वैजापुरातील पर्यवेक्षक शाहरुख युनूस शेख (30), पवन सुरेश शिरसाठ (35) आणि परीक्षार्थींपर्यंत प्रश्नांची उत्तरे पोहोचवणारी ब्रिजवाडीतील महिला सफाई कर्मचारी बाली रमेश हिवराळे (30) या तिघांना अटक केली आहे. तसेच पेपर फुटीचे धागेदोरे टिस्कॉन कंपनीच्या वरिष्ठांपर्यंतही पोहोचत असल्याचे उघडकीस आल्याने पोलिसांनी त्यांनादेखील रडारवर घेतले आहे. पूर्वी अटक झालेला राजू नागरे हा पेपर फुटी प्रकरणात सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात चार गुन्हे दाखल असल्याचे उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी सांगितले.
एका विद्यार्थ्याकडून तीन लाख रुपये
इऑन डीजीटल परीक्षा एका शिफ्टमध्ये 800 परीक्षार्थी बसतात. केंद्रावर कंत्राटी काम करणारा शाहरुख हा एमपीएससीची तयारी करतो. पवन शिरसाठ याचे बीएपर्यंत शिक्षण झाले आहे. उत्तरे देण्यासाठी नागरे व त्यांच्या रॅकेटकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेत असल्याचेही समोर आले. तसेच आरोपी पवन हा टीसीएसचा कंत्राटी कर्मचारी असल्याने त्याने त्याच्या मामाची मुलगी बालीला हाउसकीपिंग साठी कामावर घेतले होते.




























































