
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी गेल्या 15 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे. 1 सप्टेंबर रोजी या आंदोलकांवर अतिशय निर्घृणपणे लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यानंतर राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. या दरम्यान, या आंदोलनासंदर्भात एक धक्कादायक वृत्त आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या बीड येथील दांपत्याने आत्महत्या केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी या दांपत्याने बीड येथील ग्रामपंचायतीसमोर लाक्षणिक उपोषण सुरू होते. या उपोषणातून उठून घरी गेलेल्या एका आंदोलकाचा आणि त्याच्या पत्नीचा मृतदेह आढळला आहे. राजू चव्हाण (33) आणि सोनाली राजू चव्हाण (30, जातेगाव) अशी या दांपत्याची नावं आहेत. जातेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर मंगळवारी सकल मराठा समाजाच्या वतीने लाक्षणिक उपोषण सुरू होतं. त्यात राजू सहभागी होते. सहभागी झालेल्यांपैकी काहींची भाषणे सुरू असतानाच राजू चव्हाण हे आंदोलनातून उठून गेले. काही वेळातच राजू चव्हाण व त्यांची पत्नी सोनाली यांनी आत्महत्या केल्याची घटना उघड झाली.




























































