सेलेब्रिटी चॉइस- ओढ लावणारं वाचन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मकरंद माने

 

 

शाळेत असताना फारसं वाचन नाही झालं, परंतु घरी मनशक्ती केंद्राची पुस्तकं यायची. त्यात संस्कार गोष्टी, स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी, अध्यात्म व विज्ञान यांच्याशी निगडित गोष्टी होत्या. त्या वाचायची आवड होती मला. त्यानंतर पहिलं पुस्तक वाचलं ते म्हणजे ‘गॉडफादर’चे मराठी अनुवादित पुस्तक. अगदी भारावून गेलो होतो ते वाचून. नंतर हळूहळू गोडी लागली, परंतु खरं वाचन सुरू झालं ते ललित केंद्रात नाटय़क्षेत्राचा अभ्यास करताना. इथे साहित्य, नाटक वाचायचं म्हणजे काय हे कळलं. त्यावेळी खूप वाचन झालं. गिरीश कर्नाड, तेंडुलकर, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार यांचं सगळं साहित्य वाचलं.

विद्यार्थीदशेत असताना ‘कोसला’ वाचल्याने ते मला अधिकच जवळचं वाटतं. त्यानंतर नेमाडेंची सगळीच पुस्तकं वाचली. त्यांच्यासोबत पुलं अत्यंत आवडते लेखक. त्यांचं कोणतंही पुस्तक आवडत नाही असं नाही. त्यातही ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे अधिक जिव्हाळ्याचे. अण्णाभाऊ साठे यांची ‘फकिरा’, ‘माकडीचा माळ’, मुरलीधर खैरनार यांचं ‘शोध’ ही पुस्तकं मी कधीही, कितीही वेळा वाचू शकतो या यादीत येतात. महेश एलकुंचवारांचं लेखन आपल्याला स्वतच्या परिघातून इतरांचा शोध घ्यायला लावतं. ‘वाडा चिरेबंदी’ असो वा त्यांचं इतर कोणतंही पुस्तक वा नाटक, ते वाचल्यानंतरचा आपला स्वतचा प्रवास सुरू होतो, तर आळेकरांचं लेखन अतिशय वेगळ्या धर्तीवरचं आहे. त्यांच्या नाटकातला ब्लॅक ह्युमर कायम आकर्षित करणारा. म्हणूनच त्यांचं ‘महानिर्वाण’ हे नाटक कालातीत आहे असं वाटतं.

भाऊ पाध्ये यांची पुस्तकं वाचन प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरावीत अशी आहेत. त्यांची ‘राडा’, ‘वासुनाका’ या पुस्तकांमधील पात्रं कुठेतरी दिसू लागतात. असंच जयंत पवारांची नाटकं वाचताना वाटतं. आजूबाजूचं खरंखुरं जग त्यांच्या लिखाणातून आपण अनुभवतो. मनोज बोरगावकर यांचं ‘नदिष्ट’ हे माझं आवडतं पुस्तक. नदी आणि तिच्याशी जोडलेलं जग हे नातं खूप वेगळ्या प्रतलावर घेऊन जातं. गिरीश कर्नाडांचे लेखनही समकालीन वास्तव मांडणारे वाटते. त्यांचे ‘हयवदन’, ‘तलेदंड’, ‘तुघलक’ ही आवडती पुस्तकं. रामायण, महाभारत या महाकाव्यांचा आपल्यावर पगडा आहे. मला यातलं ओढ वाटणारं पात्र म्हणजे कर्ण. म्हणूनच मी कर्ण या व्यक्तित्वावर आधारित पुस्तकं वाचली आहेत. सहजसोप्या पद्धतीने कर्ण आपल्यापर्यंत पोहोचवणारी ‘मृत्युंजय’, ‘राधेय’ ही माझी आवडती पुस्तकं आहेत. एस.एल. भैरप्पा यांचं ‘पर्व’ म्हणूनच खूप आवडतं.

नाटय़शास्त्राचा अभ्यास करताना इंग्रजी क्लासिक साहित्य वाचलं, पण हिंदी साहित्याकडे माझा ओढा कायम आहे. उदय प्रकाश यांचं ‘मोहन दास’, ‘तिरीछ’, ‘पीली छत्रीवाली लडकी’ ही माझी अत्यंत आवडती पुस्तकं. सध्या मी रंगनाथ पठारेंचं ‘ताम्रपट’ वाचत आहे आणि मी त्यात पूर्ण हरवून गेलो आहे असं म्हणेन मी. हे हरवणं ओढ लावणारं असतं. पुस्तकांच्या जगात हरवताना आपला शोध सुरू होतो. आपला परीघ विस्तारत जातो. म्हणूनच हा अनुभव प्रत्येकाने घ्यायला हवा.