
>> अंजुषा पाटील
‘अष्टपैलू – शिरीष पै व्यक्ती दर्शन’ हे पुस्तक कवयित्री शिरीष पै यांचं बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडवून आणणारं आहे. सदर पुस्तकात 16 प्रकरणे असून पुस्तकाचे संपादन मधुकर भावे यांनी केले आहे.
आचार्य अत्रे हे शिरीष पै यांचे वडील. कवयित्री शिरीषताईंच्या साहित्य जीवनाची सुरुवात एक कवयित्री म्हणून झाली. 1959 साली त्यांचा ‘कस्तुरी’ हा पहिला संग्रह प्रसिद्ध झाला. ‘आईची गाणी’, ‘एकतारी’, ‘एका पावसाळ्यात’, ‘विराग’, ‘ऋतुचित्र’, ‘चंद्र मावळताना’, ‘अंधारयात्रा’, ‘शतकतारका’ इत्यादी पुस्तके प्रकाशित झाली. ‘हायकू’ हा जपानी काव्यप्रकार शिरीष पै यांनी हिंदुस्थानात आणला. मराठी साहित्यात ‘हायकू’ची प्रतिष्ठा शिरीषताईंमुळेच निर्माण झाली.
बालकविता, अभंग, भक्तिगीते रचून पत्रकार आणि साप्ताहिक ‘नवयुग’ व ‘दैनिक मराठा’ या वृत्तपत्राच्या प्रतिनिधी म्हणून 60 वर्षांपूर्वी अनेक नामवंतांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. विजय तेंडुलकर, शंकरराव खरात, बाबुराव बागूल, दया पवार, केशव मेश्राम आणि नारायण सुर्वे या साहित्यिकांना शिरीषताईंनी घडवले.
’अष्टपैलू’ या पुस्तकात शिरीषताई यांच्या व्यक्तिमहत्त्वाचा वेध घेतला आहे. व्यक्ती, चरित्रकार म्हणून त्यांनी ‘पप्पा, तुम्ही म्हणजे तुम्हीच…’ हा लेख लिहिला आहे. आचार्य अत्रे यांच्या सवयी, खाणं-पिणं, गाणं शिकणं, गीतकार, चित्रपट, काँग्रेस पक्ष ते समाजवादी पक्षात प्रवेश, पर्यटन इत्यादी गोष्टींचा त्यात उल्लेख आहे. ‘आईची पाऊले…’ यात वडील गेल्यानंतर त्यांची आई एकटी असताना आईसाठी जे काही केले ते प्रेमाने व जबाबदारीने काय आणि कसे केले हे पुस्तक वाचूनच समजेल. ‘व्यंकटेश…’ या लेखात शिरीषताईंनी आपले पती व्यंकटेश, विवाह, सहजीवन इत्यादीचे वर्णन रेखाटले आहे.
आचार्य अत्रे हे प्रस्तावनाकार होते. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून शिरीषताईंनीसुद्धा प्रस्तावना दिल्या. ‘हृदयरंग’, ‘प्रणयगंध’, ‘रानपाखरे’, ‘भवसागर’, ‘प्रेमरोग’, ‘विस्मयकारी ऊनसावली’, ‘कमलपत्र’ अशा अनेक कथासंग्रहांत शिरीषताईंच्या लेखणीतून समाज जीवनाचे निरीक्षण आणि लेखन हृदयस्पर्शी झाले आहे. ‘कळी एकदा फुलली होती’, ‘हा खेळ सावल्यांचा’ आणि ‘झपाटलेली सोन्याची खाण’ ही त्यांची मराठी रंगभूमीवर गाजलेली नाटके. उषा मेहता यांनी ‘हायकू’ आणि ‘शिरीषताई’ हा लेख लिहून त्यांच्या अनेक हायकूंचा आढावा घेतला आहे. अॅड. पामादित्य आणि अॅड. राजेंद्र पै हे शिरीषताईंचे सुपुत्र. त्यांनी आपल्या आईच्या आठवणी, कविता, हळवेपण याविषयी ’माझी आई’ या लेखात वर्णन केले आहे.
अशोक हांडे यांनी ‘माझी ताई’, ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’, ‘माझ्या आयुष्याचं सार्थक’ या लेखात त्यांनी अनेक कार्पामांच्या माध्यमातून शिरीषताईंना कसं जाणून घेतलं याविषयी सखोल माहिती आहे. हे कार्पाम म्हणजे आनंदोत्सव असे. या कार्पामाला शिरीषताई स्वत हजर असायच्या, असं अशोक हांडे लेखात सांगतात. हे सचित्र पुस्तक वाचायला सर्वांनाच आवडेल.
अष्टपैलू
लेखक : शिरीष पै व्यक्ती दर्शन
संकल्पना, संपादन – मधुकर भावे
प्रकाशक : नम्रता मुळे
मूल्य : 200 रुपये






















































