मुद्दा – ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नारायण शंकर भागवत

आपल्या देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या प्रचंड वाढत चालली आहे. उपलब्ध माहितीनुसार देशात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 18 टक्क्यांच्या वर आहे. यापुढेही हे प्रमाण वाढत जाणार यात संदेह नाही. ज्येष्ठांच्या ठायी असणारा अनुभव आणि ज्ञान यांची यथार्थ अशी दखल घेतली ती प्रथम अमेरिकेचे माजी अध्यक्ष विल्सन यांनी. त्यांनी सर्वप्रथम 1971 मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर प्रशासकीय पातळीवर विचार करण्यासाठी एक जागतिक परिषद बोलावली. या परिषदेत बोलताना त्यांनी ज्येष्ठांबद्दल खूपच भावनिक आणि महत्त्वपूर्ण विचार मांडले. ज्येष्ठ नागरिक ही प्रत्येक देशाची संपदा आहे ज्येष्ठांच्या ठायी असलेला प्रदीर्घ अनुभव, सामंजस्य यांचा देशाच्या प्रशासकीय कामात नक्कीच मोलाचा उपयोग होईल याची जाणीव सर्वांना करून दिली. या ऐतिहासिक परिषदेमुळे ज्येष्ठांच्या प्रश्नांबाबत जगभर जागृती निर्माण झाली.

आपल्या भारतातही ज्येष्ठांच्या हितसंवर्धनासाठी चळवळ सुरू झाली. देशात बहुतेक शहरांत व मोठय़ा गावांत ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन होऊन कामकाज सुरू झाले. महाराष्ट्रातही डोंबिवली येथे डॉ. राधाकृष्ण भट यांनी 1977 साली पहिला ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला. महाराष्ट्रात स्थापन झालेल्या व कार्यरत असलेल्या असंख्य ज्येष्ठ नागरिक संघांमध्ये सुसूत्रता, समानता आणि परस्पर संपर्क होण्यासाठी या सर्व संघांचा एक महासंघ डिसेंबर 1980 मध्ये स्थापन केला आणि त्याला नाव दिले ‘फेडरेशन ऑफ सीनियर सिटिझन्स ऑर्गनायझेशन महाराष्ट्र’ (फेस्कॉम).

राज्यस्तरीय ‘फेस्कॉम’ आणि देशपातळीवर असलेल्या ‘ऑल इंडिया सीनियर सिटिझन्स ऑर्गनायझेशन’ या दोन्ही संघटनांनी सतत प्रयत्न करत ज्येष्ठांसाठी बऱयाच सवलती मिळवल्या आहेत. ज्येष्ठांना ओळखपत्र देणे, शासकीय दवाखाने व हॉस्पिटल्स, आरोग्य केंद्रात मोफत तपासणी व चिकित्सा, बँकांच्या ठेवींवर अर्धा टक्का अधिक व्याज, आयकरात इतरांपेक्षा जास्त सवलत, पोलीस कार्यालयात ज्येष्ठांसाठी हेल्पलाइन, विमान भाडय़ात 50 टक्के सवलत, निराधार एकाकी ज्येष्ठांना दरमहा आर्थिक मानधन, एस.टी. प्रवासात 65 वयाच्या वर 50 टक्के तसेच 75 वयाच्या पुढे एस.टी. प्रवास (महाराष्ट्रात) मोफत केला. त्याचप्रमाणे ज्येष्ठांना विरंगुळा केंद्रासाठी जागा तसेच फर्निचर आणि करमणूक साहित्य हे सर्व स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येत आहे. याशिवाय सामाजिक, सांस्कृतिक तसेच सार्वजनिक कार्यक्रमात ज्येष्ठांना सहभागी करण्यात येत आहे. याशिवाय कोरोना साथीच्या अगोदरपर्यंत रेल्वे प्रवासात ज्येष्ठ महिलांना (वय 58) आणि ज्येष्ठ पुरुषांना (वय 60 च्या पुढे) अनुक्रमे 50 आणि 40 टक्के सवलत देण्यात येत होती. रेल्वे प्रवासाची ही सवलत लवकरच पुन्हा सुरू होणार असल्याचे समजले आहे. अर्थात ज्येष्ठांच्या आजही काही न्याय्य मागण्या राज्य तसेच केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत. त्यांचा पाठपुरावा फेस्कॉम आणि आयस्कॉम सातत्याने आणि प्रभावीपणे करीत आहेत.

खरं तर वयाच्या साठीनंतर आपण निवृत्त झालो असे नाही. आपल्या जीवन प्रवासाचे दुसरे पर्व सुरू झाले अशी भावना ठेवून खूप काही करता येण्यासारखे आहे. अनेक ज्येष्ठांकडे विविध कला असतात, छंद असतात. गायन, चित्रकला, नाटय़, खेळ, भजन-प्रवचन यांसारख्या कला, छंदात स्वतःला गुंतवून ठेवावे म्हणजे इतरांनाही आपला सहवास हवाहवासा वाटेल. त्यामुळे आपला वेळ तर जाईलच, याशिवाय अलौकिक अशा आनंदात आपले जीवन प्रवाही राहील.

ज्येष्ठांच्या जीवन प्रवासातील एक महत्त्वाचे दायित्व म्हणजे नव्या पिढीला संस्कारित करणे. आज शिक्षण क्षेत्र म्हणजे फक्त प्रमाणपत्र देण्याचे कारखाने झाले आहेत. समाजात संपूर्ण पिढी खूप उच्च शिक्षण घेऊन सर्वत्र कार्यरत आहे. तथापि मोठय़ा प्रमाणात त्यांच्या व्यवहारी जीवनात योग्य संस्काराचा अभाव दिसून येत आहे. हे आपण सर्वत्र अनुभवत आहोत. याकरिता ज्येष्ठांनी दायित्व स्वीकारून किमान आपल्या कुटुंबातील नव्या पिढीला योग्य प्रकारे सुसंस्कारित करावे. सर्वांनीच जर ही बाब महत्त्वाची जबाबदारी म्हणून स्वीकारून त्यासाठी प्रयत्न केले तर आदर्श समाज समृद्धीसाठी मोठा हातभार लागेल.

(निवृत्त प्रशासनाधिकारी, एल.आय.सी. ऑफ इंडिया)