
>> विठ्ठल देवकाते
एकेकाळी क्रिकेट जगतावर जगतावर अधिराज्य गाजविणाऱया वेस्ट इंडीज संघाला हिंदुस्थानी क्रिकेटवेडे यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये मिस करताहेत. कॅरेबियन बेटावरील खेळाडूंच्या वेस्ट इंडीजने क्रिकेटला वेगळय़ा उंचीवर नेले. या खेळाला एक वेगळे सौंदर्य बहाल केले, मात्र हाच वेस्ट इंडीजचा संघ यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी अपात्र ठरला. कॅरेबियन क्रिकेटपटूंची खेळण्याची कला, त्यांची क्रिकेट एन्जॉय करण्याची पद्धत, तेथील क्रिकेटप्रेमींमधील ओसंडून वाहणारा उत्साह या सर्वांमुळे जागतिक क्रिकेटला खरंच वेगळं सौंदर्य या कॅरेबियन बेटांनी दिलं. हिंदुस्थानात गुरुवार, 5 ऑक्टोबरपासून क्रिकेट वर्ल्ड कपच्या ‘रन’धुमाळीला प्रारंभ झालाय, मात्र यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये विंडीजचा संघ नाहीये, हे मानायला मन अजूनही तयार होत नाहीये. रथी-महारथी खेळाडूंनी सजलेले दहा संघ वर्ल्ड कपमध्ये कौशल्य पणाला लावतील, मात्र कॅरेबियन करीच्या अभावामुळे यंदाच्या वर्ल्ड कपची मेजवानी एवढी खमंग नसणार, एवढं नक्की.
सत्तरच्या दशकात जागतिक क्रिकेटवर विंडीजची एकहाती सत्ता होती. 1975 आणि 1979 साली सलग दोन वेळा विंडीजने जगज्जेतेपदाच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले होते. क्लाईव्ह लॉईड, गॉर्डन ग्रिनीज, विवियन रिचर्ड्स, डेस्मंड हेन्स, रोहन कन्हाय, ऑल्विन कालिचरण अशा फलंदाजांनी हे दोन वर्ल्ड कप गाजविले होते. माल्कम मार्शल, ऍण्डी रॉबर्ट्स, जोएल गार्नर, मायकल होल्डिंग असा रेल्वेच्या इंजिनसारखा अंगावर येणारा वेगवान गोलंदाजीचा ताफा विंडीजच्या दिमतीला असायचा. त्यानंतर ब्रायन लारा, कार्ल हुपर, रिची रिचर्ड्सन, रामनरेश सरवान, शिवनारायण चंदरपॉल, जिमी ऍडम्स अशा फलंदाजांच्या तळपत्या तलवारी विंडीजकडे होत्या. मागील एक दशकापासून ख्रिस गेल, मार्लन सॅम्युअल्स, वावेल हाइंड्स, डॅरेन सॅमी, आंद्रे रसल, कायरॉन पोलार्ड या फलंदाजांनी विंडीजचा वारसा पुढे चालवला. कर्टली ऍम्ब्रोज, कोर्टनी वॉल्श, इयान बिशप अशा गोलंदाजांच्या मुलुखमैदानी तोफांनी विंडीजच्या गोलंदाजीची धार कमी होऊ दिली नाही. मात्र अलीकडच्या काळात टी-20 क्रिकेटचा जमाना आला. विंडीजचे खेळाडू जगभरातील लीग क्रिकेटमधून गडगंज पैसा कमवायला लागले. याचबरोबर विंडीज क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू यांच्यातील मतभेदामुळे तेथील क्रिकेटला घरघर लागली. गेल, रसल, ड्वेन ब्राव्हो, सुनील नरीन, शिमरॉन हेटमायर असे खेळाडू बोर्डाशी मतभेद झाल्याने प्रदीर्घ काळ संघातून बाहेर राहिले. त्यामुळे विंडीजच्या क्रिकेटची घडी विस्कटली. वर्ल्ड कप पात्रता फेरीतही आंद्रे रसल, सुनील नरीन, केमार रोच, हेटमायर असे खेळाडू विंडीजच्या संघात नव्हते. नवख्या खेळाडूंचा निभाव न लागल्यामुळे तब्बल 48 वर्षांनंतर प्रथमच विंडीजचा वर्ल्ड कपमधून पत्ता कट झाला. विंडीजच्या क्रिकेटपटूंची अंदाधुंद फलंदाजी, हटके जल्लोष यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बघायला मिळणार नसल्याने क्रिकेटप्रेमींचा मोठा हिरमोड झालाय.
आजचे द्वंद्व
पाकिस्तान वि. नेदरलॅण्ड्स (हैदराबाद)
दुपारी 2 वाजल्यापासून थेट प्रक्षेपण
स्टार स्पोर्ट्स, डिज्नी हॉटस्टार




























































