सिक्किम – मृतांचा आकडा 22 वर, सात जवानांचे मृतदेह सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिक्कीम येथे ढगफुटी झाल्याने तीस्ता नदीला पूर येऊन झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 22 वर गेला आहे. या पुरात 22 जवानांसह 103 लोक बेपत्ता झाले होते. त्यापैकी 7 जवानांचे मृतदेह सापडले आहेत. बेपत्ता नागरिकांच्या शोधासाठी सैन्य आणि एनडीआरएफची पथकं वाढवण्यात आली आहेत. हेलिकॉप्टर आणि ड्रोन्सच्या मदतीनेही शोध कार्य सुरू आहे.

या सातपैकी चार जवानांची ओळख पटली आहे. बिन्नागौरी सैन्य चौकीतील गोपाल मड्डी, 64 ब्रिगेडचे नाईक भवानी सिंग चौहान, मधुबागन येथील नाईक एन. जी प्रसाद, बिमल ओरावन अशी या जवानांची नावं आहेत. उर्वरित जवानांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

सिक्कीम येथील वातावरणामुळे सर्व सरकारी आणि खासगी शाळा, तसंच महाविद्यालयं आणि विद्यापीठं 15 ऑक्टोबर पर्यंत बंद राहणार आहेत. शिक्षण विभागाद्वारे गुरुवारी जारी केलेल्या परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. ल्होनक सरोवरावर ढगफुटी झाल्याने तिस्ता नदीत अचानक पाणी वाढलं होतं. त्या पुरामुळे सिक्कीम राज्यातील 11 पूल वाहून गेले आहेत. या पुरामुळे चार जिल्हे प्रभावित झाले असून या जिल्ह्यांतील पाणी पुरवठा यंत्रणा, मलनिस्साःरण वाहिन्या आणि 277 घरांचं नुकसान झालं आहे.