अभिप्राय – बालमनाचा ठाव घेणारी कादंबरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अमोल देशमुख

ज्येष्ठ लेखिका सावित्री जगदाळे यांची ‘उजळपरी’ ही एक अतिशय देखणी अन् सकस कादंबरी. कादंबरीतील एकूणच कथानक, त्याची ओघवती लेखनशैली, तिच्यात आलेले बोलीतले शब्द, सोपी वाक्यं, वाक्प्रचार, रूढ म्हणी, संवाद यांचा वापर अतिशय चपखलपणे केलेला आहे. एकूण सोळा प्रकरणे या कादंबरीत आहेत.

कादंबरीतील कथानक ज्याप्रमाणे आपल्याला एखाद्या प्रदेशात घेऊन जाते, त्याचप्रमाणे त्यातून मानवी भावभावना, संवेदनशीलता, मानवता हे गाभाघटक मुलांच्या मनावर बिंबवण्यासाठी लेखिकेने जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला दिसत आहे. ही कादंबरी जंगलाची सफर घडवते. ‘माणसामाणसांत लढाया होतात. माणसं एकमेकांना मारून टाकतात, जाळून टाकतात. असं का करत असतील माणसं? सिंह सिंहाला मारत नाही. वाघ वाघाला मारत नाही. साप सापाला चावत नाही. माणूस मात्र माणसाला जखमी करतो, हल्ला करतो. ऑक्सिजन देणारे झाड तोडतो. माणूस एवढा कसा वाईट वागतो? अशा प्रकारे ही परी मुलांना मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करायला भाग पाडते.

कादंबरीचे कथानक काहीसे असे आहे. कुंभेश्वर नावाचे एक नगर असते तेथील नगरीचा राजकुमार एकदा त्याच्या सैनिकांबरोबर जंगल आणि पशू व पक्षी यांना पहायला जंगलात जातो. तिथे बराच वेळ गेल्यानंतर रात्र होते. तो शेकोटी करून शेकत बसतो. आजूबाजूला सर्व प्राणी व पक्षी झोपलेले असतात. तेव्हा अचानक तेथे उजळपरी प्रकट होते. तिचे ते दिव्य रूप पाहून राजकुमाराचे डोळे दिपून जातात. तेव्हा तो तिचा पाठलाग करतो. ती नेमकी कोण आहे? ती इथे कशी आली असेल? कशासाठी? आता ती कुठे जाणार? याचा तो शोध घेण्याचे ठरवतो आणि तिचा पाठलाग करतो. तेव्हा ती परी त्याला म्हणते की, “दहा पावले चालण्याच्या आत तिच्या काही प्रश्नांची उत्तरे देणार असशील तरच माझ्या मागे ये. नाहीतर माघारी जा तुझ्या लोकांकडे.” बुद्धिमान असलेला राजकुमार तिच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे वेळेआधी देतो. प्रश्नांची उत्तरे ऐकून परी त्याला बऱयाच मौलिक वस्तू भेट देते. त्यापैकी एक महत्त्वाची वस्तू ती त्याला भेट देते ती म्हणजे किल्ली. ही किल्ली ती का देते, याचे गूढ शेवटपर्यंत वाचकाला कळत नाही. कळल्यानंतर वाचक अचंबित होतो. अतिशय रोमहर्षक अशी इथे कलाटणी मिळाली आहे.

परी राजकुमाराला जंगलातील प्राण्यांपासून सुरक्षिततादेखील देते. त्याचे रक्षण करते. शेवटी ती त्याला एक महत्त्वाचा संदेशदेखील सांगते. तो संदेश वाचकाने कादंबरीतच वाचावा. अशा प्रकारचे काहीसे रंजक कथानक असलेली ही कादंबरी वाचकाला खिळवून ठेवते. कादंबरीत पात्र, त्यांचा परस्परांशी आलेला संवाद, संवादातील नैसर्गिक शब्दफेक या गोष्टी वाचताना वाचक कुठेही थांबत नाही किंवा संवादात येणारा नैसर्गिक साधेपणा त्याला अडखळत ठेवत नाही. माणसाची स्वार्थी वृत्ती, माणसाने त्याच्या हव्यासापोटी जंगल, प्राणी, पक्षी, वृक्ष यांवर केलेले अपामण ही परी मुलांना पोटतिडकीने सांगते. अशी अद्भुत कहाणी वाचताना वाचक एका वेगळय़ा दुनियेत हरवून जातो.

उजळपरी
लेखिका : सावित्री जगदाळे
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, पुणे
मूल्य : 170 रुपये