मध्य रेल्वेसाठी लोकल प्रवासी पाणीकम! नियोजित ब्लॉक आयत्यावेळी जाहीर केल्याने होतेय प्रवाशांची कोंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या दोन महिन्यांपासून मध्य रेल्वेकडून विविध कामांसाठी उपनगरीय मार्गावर ब्लॉक घेतले जात आहेत. त्याची माहिती रेल्वेकडून ब्लॉकच्या दिवशीच जाहीर केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांना ब्लॉकनुसार लोकल गाडय़ांच्या वेळेची माहिती न मिळाल्याने रात्री उशिरापर्यंत कार्यालयात काम करणाऱ्या चाकरमान्यांची घरी पोहोचताना मोठी कोंडी होते आहे. हार्बर मार्गावरील ब्लॉकदरम्यान तर प्रवाशांना कुर्ला, बेलापूर स्थानकात रात्र काढावी लागली आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रवाशांना चांगल्या सेवा देण्याबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे.

पनवेल स्थानकातील डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉरच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून 17 ऑगस्टपासून पुढे 42 दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक घेतला होता. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेलला जाणाऱ्या शेवटच्या दोन लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. सदर ब्लॉक 17 ऑगस्टच्या मध्यरात्री सुरू होणार होता. त्यामुळे त्याची माहिती रेल्वेने आधी दोन दिवस जाहीर करणे बंधनकारक होते. मात्र रेल्वेने ती तसदी न घेता ज्या दिवशी ब्लॉक आहे त्याच दिवशी सायंकाळी जाहीर केले. त्यामुळे रात्री शेवटच्या दोन लोकल पकडून घरी जाणाऱ्या पनवेलच्या प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणात हाल झाले होते. सोमवारी दुपारी संपणारा ब्लॉक सायंकाळपर्यंत वाढवल्याने प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणात हाल झाले होते. याबाबत मध्य रेल्वेकडे विचारणा केली असता प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी यापुढे एक-दोन दिवस आधी ब्लॉक जाहीर करण्याबाबत खबरदारी घेतली जाईल, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.

ब्लॉकची घोषणा सायंकाळी, अंमलबजावणी लगेच मध्यरात्री

गुरुवापासून रेल्वेने पुन्हा पाच दिवसांचा हार्बरवर बेलापूर-पनवेल दरम्यान ब्लॉक जाहीर केला आहे. सदरचा ब्लॉक रात्री सुरू होणार असताना त्याची माहिती सायंकाळी देण्यात आली. त्यामुळे ती प्रवाशांपर्यंत कशी पोहोचणार, ते प्रवासाचे नियोजन कसे करणार, असा सवाल प्रवाशांकडून केला.

एक्सप्रेस गाडय़ांचे प्रवासी बेहाल

पनवेलनजीक मालगाडी घसरल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यासाठी तब्बल 27 तास लागले होते. त्याचा अंदाज न घेताच रेल्वेने अनेक गाडय़ा शेडय़ुल केल्या होत्या. त्यामुळे त्या ठिकठिकाणी थांबवून ठेवल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते.