दीर्घायु भव – उंची वाढू शकते!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैद्य सत्यव्रत नानल

उंची किती असावी? ती कशावर अवलंबून असते? उंची वाढवण्यासाठी उपाय काय? औषध, आहार विहार, पंचकर्म याने काही फायदा होतो का? या प्रश्नांची आयुर्वेदानुसार उत्तरे आज आपण पाहू या.

उंची किती असावी, याचा काटेकोर नियम नाही. आपल्या कुटुंबामध्ये जशी उंची असते तेवढी उंची सर्वांची सामान्यतः मिळते. यालाही अपवाद असतात. आपल्या आईवडिलांप्रमाणे सामान्यतः आपली उंची दिसते. आईवडील यापैकी ज्यांची ठेवण आपण घेतो, त्यांच्याप्रमाणे उंची घडते. आपल्या सभोवतालच्या भौगोलिक परिस्थितीनुसारही उंची ठरते. आपल्या शारीरिक हालचाली कशा, कोणत्या प्रकारच्या, किती यावरही आपल्या शरीराचा विकास ठरत असतो. उंचीही त्याला अपवाद नाही. भरपूर हालचाल, खेळ हे वाढत्या वयात याच कारणामुळे केले पाहिजेत. शरीरातील हाडांच्या लांबीवर शरीराची उंची अवलंबून असते. विशेषतः पायांची हाडे आणि पाठीचा पूर्ण मणका यांची लांबी जितकी जास्त तितकी उंची अधिक मिळू शकते.

उंची वाढू किंवा कमी होऊ शकते का?
‘होय’ आणि ‘नाही’ असे दोन्ही या प्रश्नाचे उत्तर आहे. वयाच्या 18 ते 21 वर्षांपर्यंत शरीराची वाढ होत असते. त्यामुळे उंचीसुद्धा या वयापर्यंत वाढत असते, वाढू शकते. शरीराचे पोषण तसेच शारीरिक हालचाली जेवढय़ा उंची वाढण्यासाठी पोषक, तेवढी उंची वाढण्याची शक्यता जास्त. काही वेळेस पौगंडावस्थेत येताना बदल होऊन उंची झपाटय़ाने वाढू शकते. ही कारणे नसतील तर उंची कमी राहू शकते. उंची कमी राहण्याची कारणे आहेत. अपघात, पायांची हाडे मोडणे, वाकणे इत्यादी अनेक कारणांनी, वाढत्या वयात कुपोषण, लहानपणी पोटात जंत होण्याचा त्रास दुर्लक्षित राहिला तर शरीराचे कुपोषण होऊन उंची वाढ थांबते.

उपाय काय
वाढते वय असेल आणि कोणतेही रोग नसतील तर आहार, व्यायाम आणि आवश्यक औषधे घेऊन फायदा होऊ शकतो. घरात सामान्यतःच जर सगळ्यांची उंची कमी असेल तर फार फायदा होणे अवघड. थोडा फायदा नक्की होऊ शकतो.

आहारीय उपाय
शरीरातील रक्त, मांस, हाडे, मज्जा, धातू या सर्वांचे पोषण होईल असा आहार घ्यावा. यामधे मांसाहार करणाऱयांनी पाया सूप, लिव्हर सूप, मटण सूप नियमित घ्यावे. शाकाहारी लोकांनी भरपूर दूध, तूप खावे.
उडदाची खीर खावी. त्याने शरीरावर मांस, स्नायू चांगले वाढतात आणि हाडे मजबूत होतात.
गाजर, शेवगा, डाळिंब, लसूण, काळी मिरी, मुळा, कढीपत्ता यांचा वापर आहारात करावा. त्याने पोटातील जंत कमी होतात आणि पचन सुधारते. नुसते पोषक खाऊन काम होत नाही, ते पोषण पचवणेही अत्यंत आवश्यक आहे.
गव्हाचे सत्त्व (गव्हाचा चीक) आठवडय़ातून एक वेळ दुधात किंवा पाण्यात किंवा चिकन सूपमध्ये किंवा भाज्यांच्या सूपमध्ये शिजवून खावा. त्यासोबत भरपूर तूप घ्यावे. याने हाडे आतून भरतात.
भाजके चणे, ड्रायफ्रूट्स, ओला नारळ,
गूळ-खोबरे हे प्रकार मधल्या वेळेत चावून खावेत.
लसूण आणि सुके खोबरे एकत्र करून केलेली चटणी जेवणासह खावी. याने हाडे बनण्याची प्रक्रिया सुधारते आणि हाडे मजबूत होतात. खाल्लेले पोषण मांस आणि हाडांपर्यंत सहज पोहोचते.

विहारीय उपाय
मणक्याची हाडे सुदृढ आणि मोकळी, मोठी होण्यासाठी निवडक योगासने शिकून ती करावीत. पूलअप्स करणे, उंच उडय़ा मारणे, सायकलिंग करणे हे काही उपाय प्रसिद्ध आहेतच. मल्लखांब, रोप मल्लखांब, सिल्क, टांगता मल्लखांब, मातीतील कुस्ती यांनी संपूर्ण शरीराची नीट वाढ व्हायला नैसर्गिकरीत्याच उत्तम फायदा होतो. कमी वयात वजन उचलून बैठका मारणे टाळावे. झोपून किंवा बसून राहणे टाळावे. शरीरातील रक्तपुरवठा व्यायाम केल्याने सुधारतो आणि खाल्लेले पोषण सर्व अवयवांना मिळते.

औषधी उपाय
आयुर्वेदात हाडे भरण्यासाठी उत्तम औषधे आहेत. पंचकर्म उपाय, औषधी तेल, तुपाचे विधिवत स्नेहपान. बाह्य स्नेहन, स्वेदन म्हणजे औषधी तेलांनी मालिश आणि त्यानंतर औषधी वाफेचे शेक घेणे. विविध औषधी तेल, तुपाचे बस्ती प्रयोग उत्तम काम करतात.
पृष्ठवंश बस्ती, कटी बस्ती, कटी अवगाह असे अनेक प्रकार आहेत, ज्यांचा गरजेप्रमाणे उपयोग केला जातो. असे अनेक उपाय आवश्यकतेनुसार आपापल्या वैद्यांना विचारून करावेत आणि आपली शारीरिक उंची वाढवावी.
आपली शारीरिक उंची किती आहे यावर समाज काहीही म्हणत असला तरी आपली वैचारिक उंची किती मोठी आहे त्यावरच समाज आपली आठवण काढतो हेही लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे.

[email protected]