
इस्रायल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेला रक्तरंजित संघर्ष आता धोकादायक वळणावर पोहोचला आहे. हमासनेही आक्रमक भूमिका घेत तेल अवीवर मोठा हल्ला केला. रॉकेट्स हल्ल्यामुळे सगळीकडे एकच पळापळ झाली. आक्रोश आणि स्फोटाच्या आवाजांनी परिसर हादरला. इस्रायलनेही दुसऱया टप्प्यातील हल्ल्याची तयारी पूर्ण केली असून हमासच्या दहशतवाद्यांचे तुकडे तुकडे करू अशा शब्दांत आक्रमक भुमीका घेतली आहे. त्यामुळे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, इस्रायलने डागलेल्या रॉकेट्समुळे गाझा पट्टीतील शेकडो इमारती जमिनदोस्त झाल्या असून त्यांच्या ढिगाऱ्याखाली हजारो पॅलेस्टिनी गाडले गेल्याची भीती व्यक्त होत आहे.
लेबनॉनमधून हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ले चढवल्याच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी इस्रायलच्या सैन्याने लेबनॉनमधून हिजबुल्लाहविरोधात आणखी एक आघाडी उघडण्याची तयारी सुरू केली आहे. लेबनॉन सीमेवरील 2 किलोमीटरपर्यंतचा परिसरही रिकामा करण्यात आला असून इस्रायलमधील 28 समुदायांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे. इस्रायलने हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांनाही चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली असून हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
दक्षिण गाझामध्ये युद्धविराम नाही
उत्तर गाझामध्ये हमासच्या दहशतवाद्यांचे जमिनीखाली मोठय़ा प्रमाणावर अड्डे असण्याच्या शक्यतेमुळे नागरिकांनी उत्तर गाझा रिकामे करून दक्षिण गाझामध्ये जाण्याचे आवाहन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी केले. मात्र दक्षिण गाझातूनही इस्रायलवर रॉकेट्स डागण्यात येत असल्याचे सोमवारी दिसले.
– हमासने 199 इस्रायलींना ओलीस ठेवले आहे. या युद्धात इराणही मध्ये पडल्याने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका असा इशारा दिला आहे.
– गेल्या 10 दिवसांत गाझा पट्टीतील सुमारे 2 हजार 670 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला तर हमासच्या हल्ल्यात सुमारे 1 हजार 400हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
– मानवतावादी दृष्टिकोन ठेवणे इस्रायल आणि हमास दोघांचेही कर्तव्य असून युद्ध विनाशाकडे चालले आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटेनियो गुटेरस यांनी म्हटले आहे.
मुस्लिम राष्ट्रांची पॅलेस्टिनींना बंदी का? – निक्की हेली
गाझामधून सुरक्षित ठिकाणी जाऊ इच्छिणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांना इतर मुस्लीम राष्ट्रे आसरा का देत नाहीत, असा सवाल अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मैदानात असलेल्या रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवार निक्की हेली यांनी केला आहे. या युद्ध प्रकणी सातत्याने अमेरिका-इस्रायलवर टीका केली जात आहे. मात्र मुस्लीम राष्ट्रांनी मनात आणले तर सर्वकाही ठीक होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, हेली यांनी याआधी इराणसोबत झालेल्या अण्वस्त्र कराराच्या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि सध्याचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर प्रचंड टीका केली होती.
मदत पोहोचवण्याची परवानगी द्या – संयुक्त राष्ट्रे
हमासशासित गाझा पट्टीत जवळपास 23 लाख लोक राहतात. इस्रायलने या लोकांचे पाणी, इंधन, वीज बंद करून टाकले आहे. रुग्णालयांमधील स्थिती भयावह आहे. या पार्श्वभूमीवर हमासने अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांना सोडावे आणि इस्रायलनेही गाझा पट्टीतील नागरिकांपर्यंत मदत पोहोचवण्याची परवानगी द्यावी, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटेनियो गुटेरस यांनी केले आहे. संयुक्त राष्ट्रांकडे मिस्र, जॉर्डन, वेस्ट बँक आणि इस्रायलमध्ये अन्नधान्य, पाणी, जीवनावश्यक वस्तू, औषधे, इंधन मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे, हे सर्व काही तासांत गाझामध्ये पोहोचवले जाऊ शकते, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.






























































