
मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतलेली असतानाच येथील बदनापूर पंचायत समिती कार्यालयात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री अतुल सावे व आमदार नारायण कुचे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाबाहेर मोठा गोंधळ उडाला. या कार्यक्रमाला विरोध करणार्या कार्यकर्त्यांमध्ये व पोलिसांमध्ये धक्का-बुक्की होऊन कार्यक्रमाला गालबोट लागले.
जालना जिल्ह्यातील बदनापूर पंचायत समिती कार्यालयात 20 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मेरी माती मेरा देश या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या वेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी कृष्णकुमार पांचाळ, आमदार नारायण कुचे यांची उपस्थिती होती. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राजकीय कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका सर्वत्र व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर येथे पोलिस उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे यांच्यासह पोलिस निरीक्षक सुदाम भागवत, पोलिस सहनिरीक्षक जगदिश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 50 ते 70 पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला होता.
अंबड तालुक्यातील चिकनगाव येथील सुनील कावळे या युवकाने मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे आत्महत्या केल्याच्या घटनेने समाजात हळहळ व्यक्त होत असतानाच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमदार- खासदार हे त्यांच्या मतदारसंघातील एका युवकाने आरक्षण प्रश्नी बलिदान दिलेले असताना सार्वजनिक कार्यक्रम घेत असल्याच्या निषेधार्थ व मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी कार्यक्रमस्थळी एकत्रित झाले. या कार्यकर्त्यांनी एक मराठा, लाख मराठा, आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत कार्यक्रमात घुसण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांत व त्यांच्या धक्का-बुक्की होऊन गोंधळ उडाला.
जोरदार घोषणाबाजी करत आमदार, खासदार यांच्या मतदारसंघातील युवकाने केलेल्या आत्महत्येनंतर दु:खात असणार्या समाजाकडे दुर्लक्ष करून कार्यक्रम घेणार्या नेत्यांचा या प्रसंगी आंदोलकांनी निषेध व्यक्त केला. पोलिसांनी 12 ते 15 आंदोलकांना लेखी समज देऊन कारवाई केली.
‘आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांचा कार्यक्रम नाहीच!’
सकल मराठा समाजाने मराठा आरक्षणासाठी जोरदार लढा उभारलेला असताना आता तो आणखी तीव्र करण्यात आलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत माघार नाही तसेच राजकीय नेता असलेला कार्यक्रम बदनापूर तालुक्यात होऊ देणार नाही, होणारे कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राम सिरसाट, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख संतोष नागवे यांच्यासह सकल मराठा समाजाच्या वतीने थेट देण्यात आला आहे.





























































